Vertical Farming: व्हर्टिकल फार्मिंग – भविष्यातील शेतीचा अनोखा आणि उपयुक्त पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतजमिनीचे (Vertical Farming) हिस्से-वाटप आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता यामुळे सध्या शेती योग्य जमिनीचा आकार दिवसेंदिवस लहान होत चालला आहे. त्यातच देशाची वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात कमी जागेत पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल हे शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुद्धा सुरू आहेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे ‘व्हर्टिकल फार्मिंग’ (Vertical Farming).

1999 साली डिक्सन डेस्पोमियर यांनी सर्वप्रथम ‘व्हर्टिकल फार्मिंग’ संकल्पना मांडली होती. सध्याच्या घडीला जगभरात अबू धाबी, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बंगलोर, दुबई, बीजिंग यासारख्या शहरांमध्ये 2014 पासून वेगवेगळे स्टार्टअप्स ‘व्हर्टिकल फार्मिंग’ (Vertical Farming) वर काम करत आहेत.

‘व्हर्टिकल फार्मिंग’ म्हणजे काय?

व्हर्टिकल फार्मिंग एक अशी शेती पद्धती आहे ज्यामध्ये उभ्या रचलेल्या थरामध्ये किंवा रचनेमध्ये व्हर्टिकल म्हणजे उभ्या दिशेने शेती केली जाते.

यात मांडवा सारखे स्ट्रक्चर उभारले जाते. नियंत्रित वातावरणात एक्वापोनिक्स, हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स सारख्या तंत्रांचा वापर करून शेती केली जाते, विशेष म्हणजे यात मातीचा वापर होत नाही. पिकाच्या वाढीसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था ठेवतात आवश्यतेनुसार नायलॉन नेटने पिके झाकण्याची व्यवस्था सुद्धा असते. या पद्धतीने हिरवा भाजीपाला, फुलपिके आणि हळद यासारखी पिके घेता येतात.

व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे (Advantages Of Vertical Farming)

  • या पद्धतीमध्ये पारंपारिक शेतीपेक्षा कमी जमीन आणि पाणी लागते. कमी जागेत जास्त रोपे लावता येतात, रिकाम्या भिंतीचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो.
  • वर्षभर पिके घेता येतात. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी जागा किंवा प्लॉट असल्यामुळे एकापेक्षा अधिक पिकांची एकाच वेळी काढणी करता येते.
  • व्हर्टिकल फार्मिंग मध्ये पारंपरिक शेतीसारखा हवामान बदल, दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका नसतो.
  • उभ्या शेतीमुळे पर्यावरण संवर्धनास मदत होते कारण पारंपारिक शेतीमुळे होणारी जंगलतोड होत नाही त्यामुळे दीर्घकालीन नैसर्गिक संसाधनांची बचत होते.
  • घरामध्ये किंवा संरक्षित जागेत शेती केली जात असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने यंत्राद्वारे नांगरणी, लागवड आणि कापणी करण्याची गरज नसते त्यामुळे मातीचे संरक्षण होते आणि कार्बन उत्सर्जन कमी होते, शेत नांगरणीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांच्यात बचत होते.
  • सिंचन करताना पाण्याची बचत होते, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकते, फळे आणि भाज्या अधिक पौष्टिक असतात.
  • घरांमध्ये उभी शेती केल्याने उन्हाळ्यात घरातील तापमान जास्त गरम होत नाही, हवेत ओलावा टिकून राहतो, प्रदूषण कमी होते.

व्हर्टिकल फार्मिंगचे तोटे (Disadvantages of Vertical Farming)

  • व्हर्टिकल फार्मिंगचा सेट अभारताना सुरुवातीला जास्त खर्च येतो.
  • व्हर्टिकल फार्मिंगमध्ये पिके उभ्या रचनेत असल्यामुळे जमिनीवरील पिकांपेक्षा या पिकांना कमी सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे या पद्धतीत विजेचा वापर जास्त केला जातो. सौर उर्जेचा वापर केल्यास सौर उर्जेचा सुरुवातीचा खर्च वाढतो.  
  • व्हर्टिकल फार्मिंग करतांना योग्य ते तंत्रज्ञान, व्यवस्थापन ज्ञान, कौशल्ये माहिती असणे आवश्यक आहे यासाठी प्रशिक्षणाची गरज असते.
  • सध्या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये फक्त काही निवडक भाजीपाला, औषधी वनस्पती आणि पिकांची लागवड करता येते. इतर पिकांच्या लागवडीसाठी अजूनही संशोधनाची गरज आहे.

अनुदान आणि कर्ज (Vertical Farming)

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ मार्फत शेतकऱ्यांना 20 टक्के अनुदान मिळते. शेतकऱ्यांना शेती करायला लागणाऱ्या खर्चाच्या 75 टक्के रक्कम कृषी कर्ज म्हणून मिळू शकते.

error: Content is protected !!