VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV Parbhani) नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास (Cotton Research Centre, Nanded) अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola), अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Cotton Research Institute, Nagpur) यांनी दिनांक 5 आणि 6 एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन (Cotton Research) प्रकल्पाच्या वार्षिक कार्यशाळेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उप-महासंचालक (पीके) डॉ. तिलक राज शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांना नागपूर येथे प्रदान करण्यात आला.

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध पिके, पीक समूह, लागवड व संरक्षण तंत्रज्ञान आणि पूरक उद्योग इत्यादी बाबतीत राष्ट्रीय पातळीवर विविध समन्वयीत संशोधन ( Agriculture Research) प्रकल्प राबवण्यात येते. यापैकी कपाशीवरील अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्प हा एक प्रमुख प्रकल्प आहे. कपाशीच्या प्रकल्पांतर्गत देशभरामध्ये एकूण 22 प्रमुख संशोधन केंद्र व 10 उपकेंद्र कार्यरत आहेत. या प्रकल्पातर्फे यावर्षी पासून प्रथमच उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार सुरू करण्यात आला असून पहिलाच पुरस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani) अंतर्गत कार्यरत कापूस संशोधन केंद्र नांदेडने पटकविला आहे.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे कार्य (VNMKV Parbhani)

हे कपाशीचे राज्यातील प्रमुख संशोधन केंद्र असून मागील 83 वर्षांपासून कापूस संशोधनामध्ये कार्यरत आहे. या  संशोधन केंद्रा तर्फे आजवर देशी व अमेरिकन कपाशीचे एकूण 29 सरळ तथा संकरित वाण प्रसारित केले असून एनएचएच 44 (नांदेड 44) हा त्यापैकी एक प्रमुख वाण आहे. याबरोबर पीक लागवड व संरक्षण विषयी शेतकर्‍यांच्या गरजेनुसार अनेक शिफारसी वेळोवेळी दिल्या आहेत. शेतकर्‍यांनी बीटी कापूस लागवड सुरुवात केल्यापासून त्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी आवश्यक लागवड तंत्रज्ञान राज्यातील शेतकर्‍यांना सर्वप्रथम या संशोधन केंद्राद्वारे शिफारस करण्यात आले होते.

सदरील पुरस्कार निवडतांना देशातील कपाशीच्या (Cotton) सर्व संशोधन केंद्रांचे मागील दोन वर्षांतील कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सन 2022-23 व 2023-24 हंगामामध्ये या संशोधन केंद्राद्वारे बीटी कपाशीचे (bt Cotton) तीन सरळ वाण (एनएच 1901 बीटी, एनएच 1902 बीटी व एनएच 1904 बीटी), एक अमेरिकन वाण (एनएच 677) व दोन देशी (गावराण) सरळ वाण (पीए 837 व पीए 833) असे एकूण सात वाण प्रसारित केले आहेत. त्याचबरोबर पीक लागवडी संदर्भात कोरडवाहूसाठी ओलावा संचयन, हवामान बदलामध्ये लागवडीचे अंतर, सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन (Nutrient Management) इत्यादी बाबतीत चार शिफारसी दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय प्रयोगांमध्ये प्राधिकृत वाणांची संख्या, शोध निबंध, कृषि विस्तार, प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाचे आयोजन इत्यादी बाबतीत सरस काम आढळून आल्यामुळे कपाशीचे ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ हा पुरस्कार नांदेड येथील संशोधन केंद्रास देण्यात आला आहे.

कुलगुरूची संशोधन केंद्रास भेट

विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक 8 एप्रिल रोजी कापूस संशोधन केंद्रास आवर्जून भेट दिली. यावेळी मा. कुलगुरू म्हणाले की, उत्कृष्ट संशोधन केंद्राचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब तर आहेच, शिवाय कापूस संशोधनामध्ये उत्कृष्ट संशोधन केंद्रासाठी या वर्षापासून दिला गेलेला पहिलाच पुरस्कार वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास (VNMKV Parbhani) मिळाला ही एक विद्यापीठाच्या कार्यासाठी गौरवशाली आणि स्फूर्तीदायक बाब आहे. हा पुरस्कार संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांचे संघटित व दीर्घकालीन कष्टाचे यश असल्याबद्दल त्यांनी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर वेग, शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांचे अभिनंदन केले असून विद्यमान पातळीपेक्षा अधिक काम करण्याची आवश्यकता असून भविष्यामध्ये शेतकरीभिमुख संशोधन करावे, आणि केंद्रामध्ये विविध प्रकल्पांतर्गत प्रयोगशाळा उभारणी करून जैवतंत्रज्ञानयुक्त वाणांची निर्मिती, जैविक बुरशीनाशके (Bio fungicides) व मित्रकिडींचे उत्पादन करून शेतकर्‍यांना उपलब्ध करावे ज्यामुळे कपाशीसारख्या नगदी पिकातून किफायतशीर उत्पन्न मिळणे शक्य होईल असे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!