VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तर्फे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वनामकृवि (VNMKV Parbhani) आणि जर्मन एजन्सी जीआय झेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प (Agri-Photovoltaic Research Project) राबविण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक 11 मार्च रोजी करण्यात आले (VNMKV Parbhani) .

या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीआयझेडच्या इंडो जर्मन एनर्जी फोरमचे संचालक श्री. टोबीयास वीन्टर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या माजी मुख्य शास्त्रज्ञा डॉ. रेणु खन्ना चोप्रा, नॅशनल सोलार एनर्जी, फेडरेशन ऑफ इंडियाचे श्री. मोनू बिश्नोई हे होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि म्‍हणाले की, ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाच्‍या माध्यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड हे दोन्‍ही बाबी शक्‍य होणार आहे. हे तंत्रज्ञान जर्मनी, जपान, इटली या प्रगत देशात प्रचलित आहे. भारतात मोठया प्रमाणात सौर ऊर्जा निर्मितीस वाव असून संशोधनाच्‍या माध्‍यमातून कोणते पीक अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानात किफायतीशीर राहील, हा मूळ उद्देश जीआयझेड आणि परभणी कृषी विद्यापीठ (VNMKV Parbhani) संयुक्‍त संशोधन प्रकल्‍पाचा आहे. अॅग्रीपीव्‍ही हे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान असून यात शेत जमिनीचा कार्यक्षम वापर करून हरित ऊर्जा (Green Energy) निर्मिती शक्‍य होणार आहे . 

प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभामध्ये जीआयझेड या संस्थेद्वारे मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. संशोधन साहित्य व उपकरणे विद्यापीठास कराराद्वारे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठाद्वारे ॲग्री-फोटोव्होल्टेईक हा प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

जीआयझेडचे संचालक श्री टोबियास वीन्टर यांनी अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञान संशोधनात पुढाकार घेतल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले आहे. ‘भारतात जर्मनीपेक्षा अडीच पट जास्‍त सौर ऊर्जा उपलब्ध असून याचा लाभ अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून शेतकरी बांधवांना होवू शकतो. आज पर्यंत केवळ 2 टक्के सौर प्रकल्प उभारले असून 98 टक्के बाकी आहेत. हे सर्व प्रकल्प उभारण्यासाठी दरवर्षी 30 हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता असून भारत सरकारने हे लक्ष तिप्पट म्हणजे 90 हजार हेक्टर निर्धारित केलेले आहे. म्हणूनच भारताकडे जगातील इतर देशांचे लक्ष ॲग्री-फोटोव्होल्टेईक प्रकल्पासाठी लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले’

आयएआरआयच्‍या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रेणु खन्ना चोप्रा यांनी जागतिक तापमान वाढीमुळे उद्भवणाऱ्या उष्णता आणि दुष्काळाचा परिणामामध्ये ताण सहन करणारे संशोधन शास्त्रज्ञाने विकसित करावेत, यासाठी ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे सांगितले.

उद्घाटन समारंभास सन सीड प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री विवेक सराफ हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

हा प्रकल्प विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार असून या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीस झेंडू, टरबूज, खरबूज यासारखी पिके सोलर पॅनल खाली घेतली होती आणि सध्या तूर, सोयाबीन, हळद, केळीसारखे पिके घेऊन त्यावर संशोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर पदवीचे विद्यार्थी अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानावर संशोधन करत असल्‍याचे यावेळी नमूद करण्यात आले (VNMKV Parbhani).

error: Content is protected !!