हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य बियाणे उपसमितीची (State Seeds Sub-Committee) 53 वी बैठक (VNMKV Parbhani) गुरूवारी (8 फेब्रुवारी) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) मा. श्री अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या (VNMKV Parbhani Developed Varieties) शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण असे एकूण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती (भारत सरकार) यांना अधिसुचित करण्याची शिफारस (VNMKV Parbhani) करण्यात आली.
या सात वाणात सोयाबीनचे एमएयूएस 731, अमेरिकन कापसाचे एनएच 677, हरभरा देशी वाण परभणी चना 16, खरीप ज्वारीची परभणी शक्ती, तीळ पिकाची टीएलटी 10, मिरचीच्या पीबीएनसी 17 तसेच टोमॅटोचे सरळ वाण पीबीएनटी 20 याचा समावेश आहे.
शि़फारसीत करण्यात आलेल्या वाणाची मुख्य वैशिष्ट्ये (VNMKV Parbhani Developed Varieties)
- सोयाबीनचा एमएयूएस 731 हा लवकर येणारा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्टरी 28-32 क्विंटल) असून, विविध किडी व रोगास मध्यम प्रतिकारक आहे व मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
- अमेरिकन कापूस प्रसारित वाण एनएच 677 या वाणाची जिराईत मधील उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी 12 ते 14 क्विंटल एवढी असून, काढणीचा कालावधी 150 ते 160 दिवस आहे. हा वाण जीवाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोगास व रस शोषणा-या किडीस प्रतिकारक आहे. हा वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू कापूस लागवडीसाठी शिफारसीत करण्यात आला आहे.
- हरभरा देशी वाण परभणी चना 16 हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांञिकीसाठी सुलभ, टपो-या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.
- तीळ पिकाची टीएलटी 10 ही जात अधिक उत्पन्न देणारी, पांढरा दाणा असलेली आहे. महत्वाच्या किडी व रोगास मध्यम प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
- ज्वारीची खरीप हंगामातील परभणी शक्ती या वाणात अधिक लोह (42 मिली ग्रॅम/किलो) व अधिक जस्त (25 मिली ग्रॅम/किलो) आहे. हे वाण प्रति हेक्टरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन देते व कडब्याचे 52 ते 55 क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता देते. हा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
- मिरचीचा पीबीएनसी 17 हा वाण हिरवी मिरचीचे प्रति हेक्टरी अधिक म्हणजेच 531 ते 546 क्विंटल उत्पादन देणारा वाण असून मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आलेला आहे. हा वाण बोकड्या (लिफकर्ल) व ऍन्थ्रॅकनोज या रोगास मध्यम सहनशील आहे.
- टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी 20 हा वाण रब्बी हंगामासाठी मराठवाडा विभागात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आलेला आहे. या वाणाची उत्पादन क्षमता 614 ते 620 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व रंग गडद लाल असून प्रति फळाचे वजन 60 ते 65 ग्रॅम आहे. लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फळे पहिल्या काढणीस तयार होतात. हा वाण लिफकर्ल, फळामधील अळी, पांढरी माशी व फुलकिडे या किडीस मध्यम सहनशील आहे.
हे सात वाण प्रसारित (VNMKV Parbhani Developed Varieties) केल्याबद्दल मा.संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पीक पैदासकारांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी अभिनंदन केले आहे. हे वाण बदलत्या हवामानात शेतकरी बांधवा करिता अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.