Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; ‘या’ भागांना यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने राज्यासह देशातून माघार घेतली आहे. मात्र आता पावसाचा हंगाम संपला असला तरी आजपासून पुढील पाच दिवस ((Weather Update) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.

हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, “मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडू शकतो.”

वाऱ्याची चक्रीय स्थिती (Weather Update 23 November 2023)

तामिळनाडूच्या किनावपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने श्रीलंकेपासून बांग्लादेशच्या खाडीपर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीमुळे 23 नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरावरुन आग्नेय दिशेने राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस अनेक भागात पाऊस पडू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

आंबा पिकाला फटका

राज्यातील काही भागात या काळात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसह शेत मालाची काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्याने, या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात ‘मुसळधार’

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या प्रणालीचा परिणाम देशातील हवामानावरही दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत देशाच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. प्रामुख्याने आज कोझिकोड, तिरुवनंतपुरम, कोट्टायम, इडुक्की, केरळचे त्रिशूर आणि तामिळनाडूच्या नागापट्टिनम, थुथुकुडी, कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे.

error: Content is protected !!