हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ((Weather Update) तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस (Weather Update) पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी गारा होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. या काळात राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या मागील अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. ‘हॅलो कृषी’कडून “राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता” या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार आता हवामान विभागाचा अंदाज (Weather Update) खरा ठरला असून, मुंबई आणि आसपासच्या परिसरात तसेच कल्याणसह पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोकणात रत्नागिरी या भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी (Weather Update 26 Nov 2023)
ऐन पावसाळ्यात झाला नाही असा धुवाँधार पाऊस सातारा जिल्ह्यात शनिवारी पाहायला मिळाला. या ठिकाणी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर सलग कोसळलेल्या पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर काही ठिकाणी नाल्यांसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तिकडे मुंबईतही अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला. ठाणे जिल्ह्यातील शहापुर, कल्याणमध्येही वीजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला. चिपळूणमध्ये शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यात पाऊस कोसळला. यामुळे खळ्यांमध्ये साठून ठेवलेल्या भाताचा पाऊसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.
काही भागांत यलो अलर्ट कायम
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असू शकते. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांग्लादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. असे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.