हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुपारच्या सुमारास चांगलीच उन्हाची ताप (Weather Update) पाहायला मिळतिये. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा पारा हा 38 अंशांपर्यंत पोहचला आहे. अशातच आता राज्यात यावर्षीचा उन्हाळा हा खूपच तापदायक राहणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देशासह महाराष्ट्राच्या कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. अर्थात राज्याच्या सर्वच भागांमध्ये यंदा उन्हाळ्याच्या संपूर्ण कालावधीत कमाल तापमान हे सामान्यच्या तुलनेत अधिक राहू शकते.” असे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी पारा पस्तिशी पार (Weather Update In Maharashtra)
भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) यावर्षीच्या उन्हाळी हंगामाच्या सुरवातीचा आपला प्राथमिक अंदाज नुकताच जाहीर केला आहे. त्यात यावर्षीच्या कडक उन्हाळ्याचे संकेत देण्यात आले आहे. परिणामी, आता यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना बाहेर पडताच चांगल्याच घामाच्या धारा आणि उन्हाच्या काहिलीने बेजार व्हावे लागणार आहे. सध्याच्या घडीला मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही भाग वगळता, सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा हा 35 अंशांहून अधिक नोंदवला जात आहे. मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी, राज्यातील उच्चांकी 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
काय आहे कडक उन्हाळ्याचे कारण?
हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, सध्या प्रशांत महासागरात कार्यरत असलेली अल-निनोची स्थिती ही मे महिन्याच्या शेवटीपर्यंत कायम असणार आहे. ज्यामुळे यावर्षीचा उन्हाळा हा दरवर्षीपेक्षा अधिक कडक असणार आहे. राज्यासह देशभरात मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान खूपच अधिक राहील. याशिवाय यावर्षी उष्णतेच्या लाटांची संख्या ही देखील अधिक असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
उन्हाळी पिकांसाठी पाणी नियोजन करावे
दरम्यान, हवामान विभागाने (Weather Update) यावर्षीचा उन्हाळा हा अधिक कडक राहणार असल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असून, त्यांना उन्हाळी पिकांसाठीच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे लागणार आहे. कारण उन्हाची ताप वाढल्यानंतर पिकांना लवकर लवकर पाणी देण्याची गरज पडणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध शेततळ्याचे पाणी किंवा अन्य माध्यमातील पाणी उन्हाळी पिकाच्या शेवटापर्यंत कसे टिकवता येईल, याची आखणी करावी. तसेच या कालावधीत पिकाला पाण्याचा ताणही पडू देऊ नये.