Weather Update : राज्यात आठवडाभर भाग बदलत पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण (Weather Update) कायम आहे. शनिवारी (ता.13) देखील राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. मागील पाच दिवसात राज्यात शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ वाशिमसह इतरही भागांमध्ये सध्या भर पावसाळ्याप्रमाणे पावसाची रिपरिप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आणखी किमान आठवडाभर राज्यात पावसाचे वातावरण कायम (Weather Update) राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस (Weather Update Today 14 April 2024)

राज्यात विदर्भाला अवकाळी पावसाने (Weather Update) सर्वाधिक झोडपले असून, या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अशातच आज (ता.14) लातूर, बीड, नांदेड या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये; सोमवारी (ता.15) नाशिक, अहमदनगर; मंगळवारी (ता.16) औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र; बुधवारी (ता.17) पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे; गुरुवारी (ता.18) पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 19 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कमी दाब क्षेत्र कायम

पश्चिमेकडील अरबी समुद्रावरील वारे आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरील वाऱ्यांमुळे सध्या राज्यावर तयार असलेले कमी दाब क्षेत्र पुढील काही दिवस कायम असणार आहे. प्रामुख्याने शनिवारनंतर (ता.20) हे हवेचे कमी दाब क्षेत्र विरळ होत जाईल. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा राज्यात भाग बदलत पाऊस पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

मार्च महिन्यात विक्रमी तापमान

दरम्यान, यावर्षी संपूर्ण रब्बी हंगाम आणि आता उन्हाळी हंगामही अवकाळी पावसाचाच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेले चार महिने टप्प्याटप्प्याने राज्यासह देशभरात अवकाळी पावसाचे वातावरण कायम होते. तर अवकाळी पावसासोबतच उन्हाळ्यात तापमान देखील अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील मार्च 2024 हा महिना जून 2023 पासून विक्रमी उच्च जागतिक तापमानाचा सलग 10 वा महिना ठरला आहे. मार्च महिन्यात राज्यासह देशभरात विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे.

error: Content is protected !!