हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचा (Weather Update ) कहर सुरूच असून, अनेक भागांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता.20) सलग चौथ्या दिवशी दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर जिल्ह्यांसह कोकणात जोरदार पाऊस पाहायला मिळाला. सोलापुरात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसादरम्यान, अंगावर वीज पडून एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर तिकडे मराठवाड्यातील हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली होती.
3 दिवस पावसाची शक्यता कायम (Weather Update Today 21 April 2024)
अशातच राज्यातील पावसाचे वातावरण कायम असून, (Weather Update) पुढील तीन दिवस राज्यात प्रामुख्याने दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत वादळी पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. याशिवाय मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. इतकेच नाही तर सध्या जाणवत असलेल्या उकाड्यात देखील आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 21, 22 आणि 23 एप्रिल हे तीन दिवस दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
सूर्याचे आग ओकणे सुरूच
एकीकडे पावसाचे वातावरण असताना दुसरीकडे सूर्य आग ओकताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील तापमानाचा पारा हा 44 अंशांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये अकोला या ठिकाणी सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय चंद्रपूर 43.8, वाशीम 43.6, जळगाव 43.2, अमरावती 42.8, धुळे 42.5, वर्धा 42.5, यवतमाळ 42.5 या ठिकाणी मागील 24 तासांमध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.