हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका (Weather Update) वाढला आहे. अशातच आता पुढील 48 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे.
किमान तापमानात घट होणार (Weather Update Today 21 Jan 2024)
“बंगालच्या उपसागराहून येणारा एक सौम्य कमी दाब वाऱ्यांचा पट्टा दक्षिण कर्नाटक ते महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ या भागात कार्यरत (Weather Update) आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांमध्ये हा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र थंडीचा जोर काहीसा वाढणार आहे. गेले दोन दिवस राज्यात किमान तापमानात अल्प वाढ नोंदवली गेली होती. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये त्यात पुन्हा दोन ते तीन अंशांनी घट होऊन, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या भागांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. तर तुरळक ठिकाणी सकाळच्या सुमारास हलके धुके पाहायला मिळू शकते.” अशी शक्यताही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
थंडीचा जोर कायम
गेल्या 24 तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान हे 11 ते 19 अंशांदरम्यान असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. तर उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढला असून, मध्य प्रदेशातील नवगाव येथे मागील 24 तासांत निच्चांकी 3.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मध्य प्रदेशातील विविध भागांमध्ये किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सियस दरम्यान नोंदवले गेले आहे.
काही भागांचे तापमान
गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 31.1 (13.4), अहमदनगर 29.8 (14.4), धुळे 28 (10), जळगाव 28.8 (11), कोल्हापूर 29.6 (17.5), महाबळेश्वर 24.8 (14 ), नाशिक 29.3 (12.7), निफाड 28.2 (11), सांगली 30.3 (18.1), सातारा 30.8 (14.6), सोलापूर 33.8 (18.6), सांताक्रूझ 28.8 (17.9), डहाणू 28.6 (16.9), रत्नागिरी 30 (20.4), छत्रपती संभाजीनगर 29.4 (14.4), नांदेड 30.8 (18.6), परभणी 31.4 (17), अकोला 30.2 (17.4), अमरावती 30 (15.7), बुलढाणा 29.4 (15.7), ब्रह्मपुरी 31.7 (17.5), चंद्रपूर 30 (15. 4), गडचिरोली 30 (16.4), गोंदिया 26 (14.0), नागपूर 28.2 (17.2), वर्धा 28.2 (16.6), वाशीम 31.2 (15.4), यवतमाळ 31.5 (16.3).