हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन-तीन दिवस विदर्भात तयार झालेल्या पावसाच्या वातावरणामुळे (Weather Update) राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र मागील 24 तासांमध्ये राज्यातील धुळे, जळगाव, निफाड या ठिकाणी किमान तापमान पुन्हा 10 अंशाच्या खाली घसरले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तर आजही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
विदर्भात आजही पावसाची शक्यता (Weather Update Today 23 Jan 2024)
सद्यस्थितीत दक्षिण कर्नाटक, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंतच्या भागावर बंगालच्या उपसागरावरून (Weather Update) येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे एक कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. ज्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण तर विदर्भात हलका ते तुरळक पाऊस पाहायला मिळत आहे. आजही विदर्भात पावसाची शक्यता कायम असून, उद्यापासून पावसाचे वातावरण निवळणार आहे. तसेच राज्यातील सर्वच भागांमध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
किमान तापमानात घट
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यात धुळे या ठिकाणी 6.3 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाड येथे 8.8 सेल्सिअस आणि जळगाव येथे 9.0 सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे. उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 11 ते 17 अंश सेल्सिअस इतके पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातही थंडीचा कडाका कायम असून, मध्य प्रदेशातील दातीया या ठिकाणी 2.8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये धुके, थंडीची लाट अशी स्थिती कायम आहे.
काही भागांचे तापमान
मागील 24 तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 29.7 (12.1), धुळे 27.0 (6.3), जळगाव 27.7 (9.0), कोल्हापूर 31.1 (17.1), महाबळेश्वर 26.2 (13.5), नाशिक 27.6 (11.6), निफाड 28.1 (8.8), सांगली 31.6 (17.7), सातारा 31.2 (14.5), सोलापूर 33.6 (17.6), सांताक्रूझ 28.6 (12.6), डहाणू 29.3 (16.5), रत्नागिरी 30.5 (17.8), छत्रपती संभाजीनगर 28.5 (11.5), नांदेड 29.4 (16.6) , परभणी 29.3 (14.8), अकोला 29.4 (12.8), अमरावती 28.6 (14.3), बुलढाणा 27.0 (12.4), ब्रह्मपुरी 29.0 (17.1) , चंद्रपूर 30.0 (16.0), गडचिरोली 28.2 (14.2), गोंदिया 25.2 (12.9), नागपूर 27.6 (14.4), वर्धा 29.5 (15.5) , वाशीम 29.4 (12.4), यवतमाळ 30.5 (15.0).