Weather Update : राज्यात तापमानाचा पारा वाढणार; वाचा… कधी ओसरणार पावसाचे वातावरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर राज्यावर सक्रीय असणारे चक्राकार वारे (Weather Update) आता मध्यप्रदेश ते दक्षिणेत कर्नाटकाकडे सरकले आहेत. ज्यामुळे आता राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता ओसरली आहे. राज्यात आता कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असून, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आज कोरडे हवामान राहणार (Weather Update) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विदर्भात हलक्या पावसाची शक्यता (Weather Update Today 30 April 2024)

सध्याच्या घडीला राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे. तर पावसाचा अलर्ट देण्यात आला नसला तरी राज्यात काही ठिकाणी आज अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडे वातावरण पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही दमट आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमाल तापमान उच्चांकी पातळीवर

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणी ४२.८, नांदेड ४२.४, जळगाव ४२.२, मालेगाव ४२ या ठिकाणी तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर राज्यात सध्या अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार आहे. पुणे ४१.३, धुळे ४१.०, कोल्हापूर ४०.२, नाशिक ४१.२, सांगली ४१.०, सातारा ४०.५, छत्रपती संभाजीनगर ४०.७, अकोला ४१.३, चंद्रपूर ४१.८, गडचिरोली ४१.६, वाशीम ४१.८, यवतमाळ ४१.५ या ठिकाणी सध्या तापमानाचा पारा ४० हुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!