हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आजपासून 10 जानेवारीपर्यंत अनेक भागांमध्ये विजांसह भाग बदलत पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. मुख्यतः आज राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ भागांमध्ये गडगडाटी पाऊस (Weather Update Today 7 Jan 2024)
लक्षद्वीप बेटांजवळ दक्षिण अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. हा पट्टा दक्षिण गुजरातपासून, उत्तर प्रदेशपर्यंत पसरला आहे. त्यामुळे राज्यासह 8 ते 10 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात देखील गडगडाटी वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशात होऊ शकतो. असेही भारतीय हवामानशास्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
दक्षिणेत अति मुसळधारेचा इशारा
याशिवाय पुढील 5 दिवसांत तामिळनाडू आणि पुढील 2 दिवसांत केरळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुख्यतः 7 जानेवारीला तामिळनाडूमध्ये किनारपट्टीवरील भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर तामिळनाडू आणि केरळ व्यतिरिक्त दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्येही द्वीपकल्पीय भागात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे राज्यासह मध्य भारतात हवेच्या वरच्या थरामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे राज्यातील संभाजीनगर, बुलढाणा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या काही भागांमध्ये गेले दोन दिवस पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले असून, शेतकरी चिंतेत आहे. रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा जोमात असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.