Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये थंडी कायम; रब्बी पिकांना होतोय फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे उन्हाची ताप तर पहाटेच्या सुमारास थंडी असे संमिश्र हवामान (Weather Update) सध्या अनुभवायला मिळत आहे. मागील आठवडाभर राज्यात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अशातच आता पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये थंडीत झालेली वाढ कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर सर्वच भागांत किमान तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल. असा अंदाज भारतीय हवामानशास्र (Weather Update) विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र गारठला (Weather Update Today In Maharashtra)

मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान 14 ते 15 अंशांपर्यंत वाढलेले होते. मात्र मागील 24 तासांमध्ये धुळे येथे 8 अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमान (Weather Update) नोंदवले गेले आहे. ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या वातावरणानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. खान्देश पट्टयात पश्चिम भागात किमान तापमान घटले असले तरी मालेगावच्या पट्ट्यात मात्र उच्चांकी कमाल तापमान पाहायला मिळत आहे.

पिकांना काहीसा दिलासा

परिणामी, सध्या नाशिक जिल्ह्यासह खानदेशात प्राथमिक अवस्थेत असलेल्या उन्हाळी पिकांना गारवा निर्माण होऊन, फूट करण्यास मदत होत आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये लेट द्राक्ष हंगामाला देखील या थंडीचा फायदा होत आहे. याशिवाय जळगाव, पुणे यासह राज्यातील अन्य भागांमध्येही पहाटेचे किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचे आढळून येत आहे. काही भागात उशिरा पेरणी झालेल्या रब्बी पिकांना अखेरच्या टप्प्यात, पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या या थंडीपासून उशिरा पेरणी झालेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

कमाल तापमानातही घट

दरम्यान, राज्यातील कमाल तापमानातही काहीशी घट नोंदवली गेली असून, सोलापूर या ठिकाणी कमाल तापमान 35.7 अंशापर्यंत खाली आले आहे. जे मागील आठवड्यात 39 अंशापर्यंत पोहचले होते. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यात मालेगाव या ठिकाणी सर्वाधिक 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ हे काही निवडक जिल्हे वगळता राज्यात सध्या सर्व भागांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या खाली घसरलेला आहे.

error: Content is protected !!