हॅलो कृषी ऑनलाईन: शेतात काम करताना शेतकरी अनेक वेळा वेगवेगळ्या गवताच्या (Weed Allergy) संपर्कात येतात. यात प्रामुख्याने गाजर गवत (Carrot Weed), ऊस, गवताची कुसळे यांचा समावेश होतो. या गवतामुळे अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज येऊन त्या जखमेला पाणी सुटू लागते. वेळेत उपचार केले नाहीत तर जखम चिघळून (Weed Allergy) त्याचा इतर त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
त्वचेबरोबरच काही लोकांना शिंका येणे, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास सुरू होतो. ऊस किंवा गवत कापताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असून, ज्यांना ऍलर्जीचा (Weed Allergy) त्रास आहे, त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गवताच्या ऍलर्जीमुळे होणारा त्रास (Weed Allergy Reactions)
• सुरुवातीला शिंका येतात.
• घसा खवखवणे, नाकातून सतत पाणी वाहते.
• डोकेदुखी व डोळ्याभोवती सूज येते.
• डोळे, कान, नाकासह संपूर्ण चेहर्याला खाज सुटते.
• अंगावर पुरळ येणे व झोपेला त्रास होणे.
• काही लोकांना ऍलर्जीचा त्रास दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो.
ऍलर्जी टाळण्यासाठी उपाय (Weed Allergy Preventive Measures)
• गवत अथवा उसाचा पाला काढताना अंग पूर्ण झाकून घ्यावे.
• पायांत बूट व हातांत ग्लोव्हज घालावेत.
• ज्यांना कुसळाची ऍलर्जी आहे, त्यांनी तोंडाला मास्क लावावा.
• शेतातून घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी.
• शेतातील कपडे घराच्या बाहेर ठेवावीत.
• त्यातून अॅलर्जी झाली तर वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.
कुसळी गवत कापताना काळजी घ्या
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे (Dairy Business) पाहीले जाते. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्याने ओली वैरण म्हणून गाजर गवत, कडवळ, मका उसाचा पाला, आदिचा वापर केला जातो. विशेषतः कुसळी गवत कापताना काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर उसाचे काही वाणही कुसळी आहेत. त्यांचा पाला काढताना हातासह सर्वच शरीराला कुसळे लागतात; त्यातून कूस अंगावर उडाल्याने नाका-तोंडातून ती पोटात जाते. कुसळामुळे अंगावर जखमा होऊ शकतात, त्याबरोबर नाका-तोंडातून पोटात गेल्याने सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो (Weed Allergy). यासाठी अशा प्रकारचे गवत, उसाचा पाला काढताना शेतकर्यांनी (Farmers) काळजी घेतली पाहिजे.