हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडत असून, ही थंडी गहू पिकाला (Wheat Crop) अत्यंत पोषक मानली जात आहे. मात्र थंडीचा मोसम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह देशातील काही भागांमध्ये गव्हाचे पीक जोमात असून, अचानक तापमानात वाढ झाल्यास त्याचा गव्हाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी 10 टक्क्यांनी घट (Wheat Crop Production Will Decrease)
2022 आणि 2023 या दोन वर्षांमध्ये उष्ण हवामानामुळे देशातील गहू उत्पादनात (Wheat Crop) घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे या महिन्यापासूनच थंडीचे प्रमाण कमी झाल्यास सलग तिसऱ्या वर्षी गहू उत्पादनावर परिणाम नोंदवला जाऊ शकतो. कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, सध्या किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे या वाढणाऱ्या तापमानाचा गहू पिकावर परिणाम होणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सामान्य तापमानाच्या तुलनेत काहीसे अधिक तापमान नोंदवले गेले होते. ज्यामुळे 2023 मध्ये गहू उत्पादन हे अपेक्षित उत्पादनापेक्षा 10 टक्क्यांनी कमी नोंदवले गेले होते. परिणामी मागील वर्षी गहू उत्पादन सात वर्षांतील निच्चांकी पातळीवर पोचले होते.
किमान तापमानात वाढीची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, भारतीय मैदानी प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. तर पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. मात्र अचानक किमान तापमानात वाढ नोंदवली जाऊ शकते. उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांमध्ये तापमानात ही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार, या महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये तापमानात 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ नोंदवली जाऊ शकते. तापमानातील ही वाढ कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर आणि मध्य भारतातील पट्ट्यात असलेल्या गहू पिकाच्या उत्पनावर परिणाम करू शकते.