Wheat Crop : असे करा गहू पिकाचे व्यवस्थापन; उंदरांसाठी वापरा ‘हा’ पर्याय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी गहू पिकाखालील (Wheat Crop) क्षेत्रामध्ये वाढ झाली असून, विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी काही गोष्टींची काळजी घेऊन गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने गव्हाला वेळोवेळी पाणी देत आणि तण नियंत्रण करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण गव्हाला (Wheat Crop) नियमित अंतराने पाणी केव्हा दिले पाहिजे याबाबत जाणून घेणार आहोत.

गहू या पिकाला (Wheat Crop) सामान्यपणे आपल्या एकूण पीक कालावधीत 35 ते 40 सेमी इतक्या पाण्याची आवश्यकता असते. यातही गव्हाला मुख्यतः ओंबी लागण्याच्या सुमारास तसेच पिकांच्या प्राथमिक मुळांच्या वाढीसह फुटवा करताना अधिक पाण्याची आवश्यकता असते. याशिवाय ओंबीतील दाणे भरण्यासह या तीन अवस्थांदरम्यान पाणी देण्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. अन्यथा गहू उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पाण्यासोबतच गव्हाला खत नियोजन करणेही तितकेच आवश्यक असते.

गव्हाला वेळोवेळी पाणी दिल्यास तुम्ही एकरी उत्पादनात एक ते दोन क्विंटल अधिक उत्पादन मिळवू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी गव्हाला नियोजनपूर्वक पाणी आणि खते देणे गरजेचे असते. गहू पिकाला आपल्या एकूण कालावधीत जमिनीच्या प्रकारानुसार एकूण 8 ते 10 वेळा पाणी देणे आवश्यक असते. यामध्ये जमीन ही काळपोटी असेल तर कमी वेळा पाणी द्यावे लागते. तर हलक्या जमिनीत गहू पिकाला अधिक वेळा पाणी देणे आवश्यक असते.

पाण्याचे नियोजन (Wheat Crop Water Management)

  • गहू पिकाला साधारणपणे आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते.
  • मात्र गहू पिकाच्या वाढीच्या अवस्थांदरम्यान पाणी देण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते.
  • गहू पिकाला प्रामुख्याने पेरणीनंतर मुळांच्या वाढी दरम्यान 20-25 दिवसांचे पीक असताना पाणी गरजेचे असते.
  • त्यानंतर 40-60 दिवसांच्या कालावधीत गहू फुटवा करत आणि ओंबी डोकावताना पाणी आवश्यक असते.
  • तसेच 65-90 दिवसात ओंबी फुलोरा अवस्थेत असताना आणि पिकाच्या वाढीमध्ये कांड्यांची वाढ होत असताना विशेषत्वाने पाणी द्यावे.
  • 90 ते 120 दिवसांचे पीक असताना ओंबी भरताना पाणी देण्यावर विशेष भर द्यावा. जेणेकरून गहू उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.

पाणी नियोजनासह तण व्यवस्थापन देखील तितकेच आवश्यक असते. गहू पिकाला खते दिल्यानंतर त्यातील 47 टक्के नायट्रोजन, 42 टक्के फॉस्फरस, 50 टक्के पोटॅश, 24 टक्के मॅग्नेशियम आणि 39 टक्के कॅल्शियम तण वापर करत असते. तण वाढल्यास ते गहू पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे योग्य त्या अवस्थेत तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

गहू काढणी अवस्थेतील काळजी

गहू पिकावर कोणत्याही अवस्थेत एखाद्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास प्रोपीकोनॅझोल 0.1 टक्के किंवा मॅन्कोझेब 0.2 टक्के मिश्रण करून फवारावे. याशिवाय गहू पिकाचा उंदरांपासून बचाव करण्यासाठी झिंक फॉस्फाईड किंवा अल्युमिनियम फॉस्फाईडच्या गोळ्या बनवून पिकामध्ये ठेवाव्यात. यामुळे गहू पिकाला उंदरांचा त्रास होणार नाही.

error: Content is protected !!