हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासारख्या देशामध्ये सध्या अनेक शेतीमालाचे दर पडलेले असताना, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात मात्र गहू दराचा (Wheat Rate) मोठा भडका झाला आहे. परिणामी तेथील नागरिकांना एका 10 किलो गव्हाच्या गोणीसाठी 3600 ते 4000 रुपये मोजावे लागत आहे. पाकिस्तानी नागरिक गव्हाच्या किमतींमध्ये झालेली ही वाढ आणि गव्हावरील अनुदान रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. गहू दरात (Wheat Rate) झालेली वाढ सरकारने मागे न घेतल्यास हे प्रदर्शन सुरूच राहील, असा पवित्रा पाकिस्तानी नागरिकांनी घेतला आहे.
देशभर सरकारविरोधात निदर्शने (Wheat Rate In Pakistan)
पाकिस्तानमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील गहू दरामध्ये भडका झाल्याने सर्वसामान्य माणसांना गहू खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे तेथील स्थानिक संघटनांनी गिलगिट-बलुचिस्तान प्रांतासह देशभरात आक्रमक पवित्रा घेत, मागील ११ दिवसांपासून गहू दराविरोधातील आंदोलन सुरु ठेवले आहे. पाकिस्तान सरकारने गहू दरवाढ नियंत्रणात न आणल्यास संघटनांकडून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानमधील प्रांतीय सरकारांकडून गव्हासाठी अनुदान दिले जात असल्याने, ते रद्द करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
आणखी दरवाढीची शक्यता
पाकिस्तानच्या स्कर्दू, गंचे, शिगर आणि यासीन या शहरांमध्ये गहू दर वाढीविरोधातील आंदोलनाचा तीव्र भडका पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात गहू दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. गहू दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या गुलाम हुसैन अतहर, शेख अहमद तराबी, नजफ अली आणि वकील अहमद चाऊ या सर्व पक्षीय नेत्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील प्रांतीय सरकारच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असे म्हटले आहे. याशिवाय जागोजागी सुरु असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. पाकिस्तानी नागरिकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी टोकाची भूमिका घेण्यासही तयार असल्याचे स्थानिक संघटनांकडून सांगितले जात आहे.