Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. असे असतानाही सध्या गहू दराला (Wheat Rate) नेमका कशाचा आधार मिळत आहे? आणि गहू दराचा नेमका कोणाला फायदा होत आहे? असा सवाल गहू बाजारातील जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

मागणीपेक्षा अधिक उत्पादन (Wheat Rate Production More Than Demand)

अर्थशास्त्रीयदृष्ट्या कोणत्याही पिकाचा बाजारभाव हा त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो. एखाद्या पिकाला मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर त्या पिकाच्या किमती वाढतात. विशेष म्हणजे 2021 नंतर गव्हाचा पुरवठा बाजारात सुरळीत सुरु असूनही, गहू दरातील (Wheat Rate) तेजी कायम आहे. तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या एका अहवालात म्हटले होते की, 2021-22 मध्ये देशातील एकूण गहू मागणी 971.20 लाख टन होती. तर देशातील एकूण गहू उत्पादन त्यावर्षी 1077.42 लाख टनांहून अधिक नोंदवले गेले होते. तर सध्याच्या घडीला देशातील गव्हाची एकूण वार्षिक मागणी ही 1050 लाख टन इतकी आहे. तर यावर्षी गहू उत्पादन हे यापेक्षा सुमारे 70 लाख टन अधिक होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

70 लाख टन अधिक उत्पादन

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये गव्हाचे उत्पादन 1120.19 लाख मेट्रिक टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या 1105.54 लाख मेट्रिक टन उत्पादनापेक्षा 14.65 लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे. अर्थात एकूण मागणीपेक्षा यंदाचे गव्हाचे उत्पादन 70 लाख टन अधिक असणार आहे. विशेष म्हणजे 13 मे 2022 पासून देशातील गव्हाची निर्यातही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना गहू निर्यात खुली होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू पिकाला 2275 रुपये प्रत‍ि क्व‍िंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. मात्र देशभरात गहू दर हे हमीभावापेक्षा अधिक आहे.

शेतकरी/ग्राहकांना फायदा नाहीच

परिणामी, गेली दोन ते तीन वर्ष देशात मागणी पेक्षा गहू उत्पादन हे अधिक आहे. तर मग नेमका गहू दरवाढीचा (Wheat Rate) फायदा नेमका होतोय कोणाला? असा प्रश्न गहू व्यापारातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. कारण यंदा नवीन गहू हंगाम सुरु झालेला असूनही गहू दर तेजीत आहे. मागील वर्षी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातून गहू व्यापाऱ्यांच्या हातात पडताच गव्हाचे भाव गगनाला भिडले. परिणामी, आतली साखळी गहू दराचा फायदा मिळवत आहे. शेतकऱ्यांना मात्र सरासरी दरावर समाधान मानावे लागत आहे.

error: Content is protected !!