हॅलो कृषी ऑनलाईन : जिरायत हरभरा पिकातील तण व्यवस्थापनाकरिता पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी.
१) बागायती पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत करावी. पेरणीसाठी फुले विक्रम, फुले विक्रांत किंवा पीडीकेव्ही-कनक या सुधारित जातीची निवड करावी.
२) बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणास प्रक्रिया करावी.
३) जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा पावडर २.५ किलो प्रति एकर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत पसरून द्यावी.
४) पेरणीसाठी देशी जातीचे २५ ते ३० किलो प्रति एकरी तर काबुली जातीचे ४० ते ५० किलो प्रति एकरी बियाणे वापरावे. देशी जातींची पेरणी ३० × १० सेंमी अंतरावर आणि काबुली जातींची पेरणी ४५ × १० सेंमी अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ५ सेंमी खोल पडेल याची दक्षता घ्यावी.
५) हवामान बदलामुळे बरेचदा अवकाळी पाऊस होऊन पिकात पाणी साचते, पीक उभळते. हे टाळण्यासाठी रुंद गादी वाफा यंत्राने पेरणी करण्याला प्राधान्य द्यावे किंवा सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी करावी.
६) माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. माती परीक्षण शक्य नसल्यास रासायनिक खताची संपूर्ण मात्रा म्हणजेच २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश म्हणजेच ५० किलो युरिया, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट प्रति हेक्टरी पिकाची पेरणी करताना द्यावे.