White Grub: असे करा हूमणीचे एकात्मिक नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हानिकारक किडीपैकी एक असणारी हूमणी (White Grub) ही सोयाबीन,तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, उस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके यासारख्या वेगवगेळ्या पिकावर आढळते. ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. यामुळे पिकाचे सरासरी 30 % ते 80 % आर्थिक नुकसान होते तर काही भागात 100 % पीक उध्वस्त होते. जाणून घेऊ या हुमणी (Humani) किडीचे (White Grub) एकात्मिक नियंत्रण उपाय.

जीवनक्रम (White Grub Life Cycle)

हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात.

  • जमिनीत अंडी अवस्थेचा कालावधी – 9 ते 24 दिवस
  • अळी अवस्थेचा कालावधी- 5 ते 9 महिने
  • कोष अवस्थेचा कालावधी- 14 ते 29 दिवस
  • प्रौढ अवस्था कालावधी – 47 ते 97 दिवस

मे, जून, जुलै महिन्यात प्रौढ सुतावस्थेतून निघतात व मादी अंडी घालते. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात अळी पिकांची मुळे कुरतडून उपजीविका करते. नोव्हेंबर महिन्यात जमिनीत कोषावस्था असते तर नोव्हेबर ते डिसेंबर महिन्यात कोषातून प्रौढ भुगे निघतात. प्रौढ भुंगेरे बाभूळ व कडूलिंबच्या झाडावर वास्तव्य करतात.

नुकसानीचा प्रकार (Damage by White Grub)

  • प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर आल्यावरजमिनीतील कुजलेल्या सेंद्रीय पदार्थावर उपजीविका करतात.
  • दुस-या व तिस-या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून सुकतात आणि नंतर वळून जातात.
  • प्रादुर्भावग्रस्त पिके सहज उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही पिके कोलमडून पडतात.
  • उपद्रवीत झाड वाळल्याने शेतात खास प्रकारचे ठिपके आढळून येतात.
  • प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात. विशेषता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्या किडीमुळे होणारे नुकसान जास्त आढळून येते

एकात्मिक नियंत्रण उपाय  (Integrated Management Of White Grub)

  • उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.
  • मे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावरील मुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. ही क्रिया त्या भागातील  शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.
  • भुंगेरे गोळा करण्यासाठी प्रति हेक्टर एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत. यामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्यांचा नाश होतो.
  • निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.
  • जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
  • रासायनिक पद्धतीत जमिनीतून फोरेट (10 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.3 टक्के दाणेदार) 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. 
  • क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • जास्त प्रादुर्भाव आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर 10 दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये.
  • शेणखतामार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात मॅलॅथीऑनची (4 टक्के) 1 किलो भुकटी टाकावी.
error: Content is protected !!