सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचे 36 कंटेनर सातासमुद्रापार ; पहा किती मिळाला दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. आत्तापर्यंत 36 द्राक्षाचे कंटेनर सातासमुद्रापार पोहोचले आहेत. सध्या कृष्णा या काळ्या वाणास प्रति किलोस 90 ते 100 रुपये असा दर आहे. निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार असून यापेक्षा जादा दर मिळण्याच्या आशा बागायतदारांना आहेत. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्‍यात असणार्‍या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजले. जिल्ह्यातील दहा हजार 639 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे सुमारे 4 हजार कोटींचे नुकसान झाले होते.

या परिस्थितीतून शेतकर्‍यांनी बागा वाचवण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात 5 हजार 766 शेतकर्‍यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातून सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षाची निर्यात होणार आहे. यंदाच्या हंगामातील द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. युरोप देशात द्राक्षाचा पहिला कंटनेर गेला आहे. तर रशियाला 5, मलेशियाला 3 आणि आखाती देशात 27 असे एकूण 36 कंटेनर द्राक्षाची निर्यात झाली आहे. पलूस, तासगाव या दोन तालुक्यातून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ झाला असून कृष्णा या काळ्या वाणाची निर्यात होत आहे. या वाणाला प्रति किलोस 90 ते 100 रुपये असा दर मिळतो आहे. यंदाच्या निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकर्‍यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील महिन्यापासून द्राक्षाच्या निर्यातीची गती वाढेल अशी शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!