तू चाल गाड्या …! अवकाळीच्या संकटावर अनोखी शक्कल ;शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीला घातला रेनकोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

मागच्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण प्रत्येकवेळी येणाऱ्या संकटाला तोंड देत शेतकरी पुन्हा उभा राहतो. पुन्हा नव्या आशेने काळ्या मातीतून मोती पिकवण्याचा प्रयत्न करतो. दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय… या अवकाळी पावसातून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिलार या गावातील सुनील भिलारे यांनीदेखील त्यांचे स्ट्रॉबेरीचे पिक वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे . काय आहे प्रयोग चला तर पाहूया

सध्या ऋतुचक्र बदलत चाललंय त्याचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांची धूळधाण होते आहे त्यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतंय . आधीच अनेक संकटांनी पिचलेल्या या शेतकऱ्याचं या अवकाळी पावसामुळे अक्षरशः कंबरड मोडतं. वारंवार होणाऱ्या या अवकाळी पावसाचा लहरीपणातून आपल्या स्ट्रॉबेरी पिकाचे होणारे नुकसान कसे थांबवू शकतो याबाबत संशोधन करायला सुरुवात केल्यानंतर  साताऱ्यातील भिलार गावातील सुनील भिलारे या शेतकऱ्याला क्रॉप पेपर कव्हरचा पर्याय गवसला आहे. आधी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती घेऊन भिलारे यांनी हा क्रॉप पेपर मिळवून स्ट्रॉबेरीच्या पिकावर अच्छादन केलं .त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका त्यांना बसला नाही. तेवढेच नाही तर इतर रोगांपासून देखील या क्रॉप पेपर च्या आच्छादनामुळे स्ट्रॉबेरीचे संरक्षण देखील होते आहे हे स्पष्ट झाले आहे

क्रॉप पेपर म्हणजे काय ?
हा क्रॉप पेपर म्हणजे काय? तू कुठून मिळतो? त्याचं अच्छादन कसं पिकावर करायचं? या सगळ्या गोष्टींची माहिती सुनील भिलारे यांनी घेतली आणि या क्रॉप पेपरचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. इतर देशांमध्ये याचा यशस्वी प्रयोग केला जातोय मात्र भारतात फक्त राजस्थानमध्ये या क्रॉप पेपरच्या पद्धतीचा वापर केला जातोय महाराष्ट्रात अद्याप तरी कोणीच या क्राफ्ट पेपर चा उपयोग करत नाही कारण तो खर्चिक आहे आणि त्याला कोणतेही अनुदान अजून तरी राज्य शासनाकडून मिळत नाही ते अनुदान मिळावं अशी मागणी देखील सुनील भिलारे यांनी केली आहे

सुनील भिलारे यांनी केलेल्या प्रयोगानंतर या भागातील इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळाल आहे. शेतकऱ्यांवर संकट तर येतच राहतात मात्र या संकटांवर मात करणारे सुनील भिलारे यांच्या सारखे शेतकरीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात हे मात्र नक्की

Leave a Comment

error: Content is protected !!