जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर – सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने जप्त केला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचे समजले जात आहे. दरम्यान त्यावरून आरोप प्रत्यारोपाचे फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत.आता याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य करत इतर ४३ कारखान्यांबाबत देखील अशीच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच, सर्वपक्षीय नेत्यांनी साखर कारखाने लुटल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे. ‘गेल्या पाच वर्षांपासून ईडी झोपली होती का? मी कोणालाही सर्टिफिकेट द्यायला आलो नाही.

मात्र, जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रानंतर ही कारवाई झाली. चंद्रकांतदादा हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. आता त्यांनी इतर कारखान्यासंदर्भातही अशीच पत्रे लिहावीत,’ असं राजू शेट्टी म्हणाले.यासोबतच, ‘केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो,’ असं देखील राजू शेट्टी म्हणाले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Leave a Comment

error: Content is protected !!