वयाच्या २१ व्या वर्षी आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्याने मिळविले १ लाख ७५ हजार इतके उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, शिक्षण पूर्ण झालेल्या अनेक तरुणांच्या नोकरीच्या संधी हुकल्या. यामुळे बहुतांशी तरुण वर्ग जरी निराश झाला असला तरी काही तरुणांनी मात्र यावर मार्ग काढत नवे पर्याय शोधले. कोल्हापूरच्या अभिजित धनवडे या युवकानेही घरी बसून न राहता  शेतीचा निर्णय घेतला. केवळ २५ हजाराची गुंतवणूक आणि १० गुंठे शेती याच्या जोरावर त्याने चक्क १ लाख ७५ हजाराहूनही अधिक उत्पन्न घेतले. कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील अभिजित याने नुकतेच कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयातून कम्प्युटर सायन्स या विषयात पदवी पूर्ण केली आहे. त्याचे वडील कोल्हापूर एमआयडीसी मध्ये काम करतात तर आई गृहिणी आहे. संचारबंदीच्या काळात वडिलांचे काम बंद होते आणि महाविद्यालयेसुद्धा खुली नव्हती. तेव्हा आपल्या वाट्याला आलेल्या १० गुंठे शेतात टोमाटो पिकाचे उत्पन्न घेण्याचा निर्णय त्याने घेतला. कौशल्यपूर्ण आणि आधुनिक मार्गांचा अवलंब करीत स्मार्टवर्क करत त्याने हे पीक लावले. परिणामी अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले.

संचारबंदीच्या काळात बाबा घरी बसून होते, तेव्हा एक बांबुच बेट विकत घेण्याची कल्पना त्यांना आली. या बांबूंचा वापर अभिजितने ठिबक सिंचानासाठीच्या कामाला केला. उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम म्हणून पिकावर रोग पडूच नये यासाठी नेटच्या मदतीने विविध खतांची माहिती घेतली. आणि तसेच खतविक्रेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पिकांवर खत फवारणी केली. त्यामुळे पिकावर रोग पडण्याची भीती राहिलीच नाही. सकाळी २ तास आणि संध्याकाळी २ तास एवढा वेळ शेतात काम करून उरलेला वेळ अभिजित यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिला. सहा महिन्यात जवळपास ७ टनापेक्षाही अधिक उत्पन्न त्यांनी घेतले. १० गुंठ्यात ७ टन ऊस घेवून २०-२२ हजार उत्पन्न घेण्यापेक्षा भाजीपाला घेवून अधिक उत्पन्न घेणे केव्हाही उत्तम असे त्याने आमच्याशी बोलताना सांगितले.

अभिजित आता त्याच्या शेतात कोबीचे पीक घेणार आहे. याआधी त्याने वडिलांच्या सोबतीने वांगी, कांदा, कोबी असे पीक घेतले आहे. आपल्याकडे उपलब्ध गोष्टीतून सर्वोत्तम मिळविण्याच्या त्याच्या या स्वभावाचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आजच्या तरुणपिढीला शेती म्हणजे खूप कष्टाचा आणि कमी उत्पन्न देणारा व्यवसाय वाटतो मात्र जर योग्य पद्धतीने कौशल्यपूर्ण रित्या शेती केल्यास नक्कीच शेती किफायतशीर आहे यात वाद नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!