राज्य सरकार कडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नियमापेक्षा दुप्पट मिळणार नुकसानभरपाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. अतिवृष्टीनंतर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र आता आज केलेल्या घोषणेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

या घोषणेबात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ” राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer Help) मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय. तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. ” म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यातल्या अनेक भागात जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीतून सावरतो न सावरतो तोपर्यंत आता पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक शेतींना तळ्याचे स्वरूप आले आहे तर अनेक महत्त्वाच्या पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांना मोठे आशा होती मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!