शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातुरात छावा संघटनेचा रास्ता रोको

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरातही काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रास्ता रोको केला. हे आंदोलन छावा संघटनेकडून करण्यात आले. लातूर जहीराबाद महामार्गावर मसलगा इथे बैलगाडी आडवी लावत हे आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.

यासाठी रास्ता रोको आंदोलन

— सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढावलं आहे. त्यांच्या हातातील पिकं वाया गेली आहेत.
— सोयाबीन पिकावर गोगलगायीचे संकट आले आहे.
–निलंगा तालुक्यातील मसलगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्ते विकासाच्या कामात भूसंपादनात जमिनी गेलेल्या लोकांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही.
–रस्त्यांची कामे अर्धवट आहेत.

आज या भागातील शेतकरी नागरिकांनी छावा संघटनेच्या बरोबरीने रास्ता रोको आंदोलन केलं. वेळोवेळी अर्ज, विनंत्या करुनही मागण्या मान्य होत नसल्याने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर बैलगाड्या आडव्या लावत रस्ता रोको आंदोलन केलं. या रास्ता रोकोमुळं लातूर-जहीराबाद हा रस्ता बराच काळ बंद होता. यामुळं दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती. निलंगा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?

— ओला दुष्काळ जाहीर करावा.
–गोगलगायीच्या त्रासामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये तत्काळ मदत करण्यात यावी
–लातूर जहीराबाद रस्त्याच्या विकास कामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा.

Leave a Comment

error: Content is protected !!