विदर्भात ढगाळ वातावरण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झाला नाही.

पावसाळ्याचा हंगाम सुरू असूनही मागील 10-12 दिवसात राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. आज दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात घाट परिसरात आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

‘या’ भागात आज हलक्या पावसाची शक्यता

दक्षिण कोकण आणि घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कोरडं हवामान असेल. 5, 6 आणि 7 जुलैला मात्र दक्षिण महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!