Color Cotton Verity: आता कापूस पांढरा नाही रंगीत; नैसर्गिक रंगीत देशी कापसाचे वाण विकसित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, कापूस म्हंटल की पांढऱ्या रंगाचे मऊ पीक डोळ्यासमोर येते. तुम्हाला माहिती आहे का ? शास्त्रज्ञांनी नवे रंगीत देशी कापूस (Color Cotton Verity) वाण विकसित केले आहेत. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी नैसर्गिक रंगीत अशा देशी कापूस वाणांचा विकास केला आहे.

जंगली कापूस प्रजातींपासून नैसर्गिकरीत्या रंगधारणा असलेल्या तीन वाणातील दोन वाण हे दक्षिण भारतासाठी, तर एक वाण मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आला आहे. कापड उद्योगातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे वाण मोलाची भूमिका निभावू शकतील, असा विश्‍वास आहे.

कापड उद्योगामध्ये कपड्यांच्या निर्मितीमध्ये व रंग देण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. या उद्योगातून वॉशिंग, ब्लिचिंग आणि डाइंग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये ही रसायने मिसळलेली असतात. त्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पाण्यातील विरघळणाऱ्या ऑक्‍सिजनची पातळी कमी झाल्याने जलचरांवरही विपरीत परिणाम होतो. कापडाच्या टिकाऊ रंगासाठी वापरली जाणारे अनेक रसायनेही विषारी, म्युटेजेनिक आणि कॉर्सिनजेनिक (कर्करोगकारक) आहेत. असेच दूषित पाणी पुढे शेती सिंचनासाठी वापरले गेल्यास हे रसायनाचे अंश शेतीमालामध्ये उतरतात. त्यातून पुढील सर्व अन्नसाखळी प्रभावित होऊ शकते.

प्रदूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचारोग, विविध प्रकारच्या ॲलर्जी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात होणारा दाह, नासिकाशोथ, दमा, जळजळ, पाचक मार्ग, श्‍वसन, मूत्रपिंड निकामी होणे आणि कर्करोग अशा आजारांचा धोका वाढतो. मानवांसह प्राण्यांमध्ये विविध रोगांचा संसर्ग होऊ शकतो.
या साऱ्या समस्यांचे मुळ असलेल्या कापड उद्योगामध्येच डाइंग प्रक्रियेतील रसायनांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने कापसालाच नैसर्गिकरित्या रंग असलेले वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तब्बल आठ वर्षांच्या संशोधनानंतर नैसर्गिक रंग असलेले कापसाचे तीन वाण (Color Cotton Verity) विकसित केले आहेत.

जंगली कापूस प्रजातींचा उपयोग करीत हे वाण (Color Cotton Verity) विकसित करण्यात आले. पांढऱ्या कापसाच्या क्षेत्रात विलगीकरण अंतर (आयसोलेशन डिस्टन्स) हे ५० मीटर असणे गरजेचे आहे. म्हणजे इतर पांढऱ्या वाणांसोबत संकर होणार नाही. वेलस्पून, गोपुरी यांसारख्या अनेक संस्थांकडून रंगीत कापसाच्या बियाण्यांना मागणी आहे. प्रायोगिक तत्त्वावर १०० एकरांवर लागवडीसाठी वैदेही-१ या वाणाचे बियाणे तमिळनाडूतील एक संस्थेला उपलब्ध करून देण्यात आले आहे.

– डॉ. विनिता गोतमारे, ९४२२१४६८८६

वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

संदर्भ : ऍग्रोवन

error: Content is protected !!