असे करा पावसाळ्यात नुकसान करणाऱ्या उसावरील घातक रोगांचे नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. मात्र पावसाळ्यात उसावर हमखास काही रोगांचे आक्रमण होतेच. यात उसाच्या पानांवर तांबेरा, पोक्का बोंग, तपकिरी ठिपके, डोळ्यासारखे दिसणारे ठिपके (आय स्पॉट), झोनेट स्पॉट आणि जमिनीतून पसरणारा मर आणि मुळकुज हे रोग दिसतात. आजच्या लेखात आपण काही रोग आणि त्यावरील उपचार याची माहिती घेऊया…

१) तपकिरी ठिपके

या रोगामुळे उसाच्या पानावर लाल-तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर ठिपके जास्त प्रमाणात दिसतात. पानांची पूर्ण वाढ होण्याआधीच पिवळी पडतात. अशी या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण

  • सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांची मात्रा माती परिक्षणानुसार द्यावी.
  • शेतात पाणी साचणार नाही अशा पद्धतीने निचरा व्यवस्था करावी.
  • कॉपर ऑक्झीक्लोराईड २ ग्रॅम किंवा मँकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

२) तांबेरा

उसावर हमखास पडणाऱ्या रोगांपैकी एक रोग म्हणजे तांबेरा. या रोगाची लक्षणे म्हणजे, लहान व लांबट पिवळे ठिपके पानाच्या खालच्या बाजूस दिसून येतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढते. त्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी होतो. ठिपक्यांचा भाग बुरशीच्या आणि बिजाणूंच्या वाढीमुळे फुगीर होतो. पानांचा ठिपक्यालगत भाग फुटून त्यातून नारिंगी किंवा तांबूस-तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात.

नियंत्रण

  • नत्रयुक्त खताचा तसेच इतर खताची मात्रा उशिरा देऊ नये. शेतातून पाण्याचा निचरा करावा.
  • प्रोपिनेब २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने स्टीकर मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्यात.

३) पोक्का बोंग

या रोगाच्या लक्षणांमध्ये सुरवातीस तिसऱ्या आणि चौथ्या पानांच्या बेचक्यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट – पिवळसर पट्टे दिसून येतात. पाने आकसतात, लांबी घटते. रोगाची तीव्रता वाढल्यामुळे पोंगा मर किंवा शेंडा कूज दिसून येते. काही वेळेस कांड्यांवर कांडी काप (नाइफ कट) सारखी लक्षणे दिसून येतात. रोगाचा प्राथमिक प्रसार हवेमार्फत, तर दुय्यम प्रसार पाणी, पाऊस व किटकाद्वारे होतो.

नियंत्रण

  • पिकास खतांची मात्रा माती परिक्षणानुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावी.
  • शेंडेकुज आणि पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून जाळून नष्ट करावेत.
  • कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम किंवा कार्बेंन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने स्टीकर वापरून गरजेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात.

Leave a Comment

error: Content is protected !!