चोरट्यांचा कापसावर डल्ला ! एक लाखांचा कापूस चोरीला, शेतकरी चिंतेत …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोने, चांदी, वाहने या महागड्या वस्तूंची चोरी होणे हे काही नवे नाही मात्र आता चोरट्यांचा डोळा शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर सुद्धा जाऊ लागलाय. शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. औरंगाबाद येथे अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्याच्या तब्बल १७ क्विंटल कापसावर चोरटयांनी डल्ला मारलाय. त्यामुळे शेतकऱ्याचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद यथील सोयगाव तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय महादू आस्वार यांनी शेतीमाल उत्पन्नाचा माल ठेवण्यासाठी शेतात पत्र्याचे शेड तयार केलेले आहे. दरम्यान याच शेडमध्ये त्यांनी शेतातील वेचणी करून ठेवलेला 25 क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. दरम्यान चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री शेडचे कुलूप, कोयंडा तोडून आत प्रवेश करून शेडमधील वेचणी करून ठेवलेल्या कापसापैकी एक लाखाचा 17 क्विंटल कापूस वाहनात भरून चोरून नेला. दत्तात्रय आस्वार हे सकाळी शेतात गेल्यावर त्यांना शेडचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता कापूस चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले.

त्यानंतर आस्वार यांनी लगेचच माहिती सोयगाव पोलिसांना दिली. तर माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आस्वार यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधीच अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यात उरल्यासुरल्या पीकाला वाचवून शेतकरी त्यातून उत्पन्न काढत असतानाच, कापूस चोरीच्या घटना सर्वत्र वाढल्या आहेत. तर शेतातून उभ्या पिकातून कापसाची चोरी होत असतानाच, आता वेचणी करून ठेवेलेल्या कापसावर सुद्धा चोरटे डल्ला मारतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होतांना पाहायला मिळत आहे

error: Content is protected !!