गोगलगायींचा धोका टाळण्यासाठी कृषी विभाग देणार आर्थिक मदत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद

यंदाच्या खरिपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे अधिक भर दिलेला आहे. मात्र असे असताना मराठवाड्यात पेरणी होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागतो आहे. मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरसाठी शेतकऱ्यांना 750 रुपये दिले जाणार आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कृषी विभागाकडून ही मदत केवळ एका हेक्टर साठी दिली जाणार आहे. सोयाबीनवरील आकस्मिक किडीचे नियंत्रण करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार तरी कमी होणार आहेच पण गोगलगायीच्या नियंत्रणाबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीन सह इतर पिकांवर देखील गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गोगलगायी कोवळे आलेली पिकेच्या पिके नष्ट करीत आहेत. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एका हेक्टरच्या फवारणीकरिता 750 रुपये दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे ?

— शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.
–फवारणी केलेल्या किंवा इतर किटकनाशकांची पावती ही कृषी कार्यालयात जमा करावी लागणार आहे.
–यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
— केवळ शंखी गोगलगायीमुळे नुकसान झाल्यासच ही मदत केली जाणार आहे.

शंखी गोगलगायीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरीही प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांकडून चुकीची पध्दत राबवली जात असल्याने त्याचा धोका पशू-पक्षांना निर्माण झाला आहे. शेतकरी हे चुरमुऱ्याला विषारी औषध लावून शेतामध्ये फेकतात. त्यामुळे ते इतर पशू किंवा पक्षांनी खाल्ले तर त्यांच्या जीवीतासही धोका निर्माण होतो. त्यामुळे ही पध्दत चुकीची असून शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

काय करावा उपाय ?

— शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही.
–सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात.
–पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!