अमरावतीत जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ; केली प्रत्यक्ष पिकाची पाहणी ,मोजणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक कापणी प्रयोगांतर्गत तालुक्यातील मौजा कुंडखुर्द येथे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची कापणी व मोजणी केली. शेतकरी प्रल्हाद इंगोले यांच्या शेतामधील सोयाबीन पिकाची यावेळी कापणी करुन मोजणी करण्यात आली.अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सोयाबीन पिकाची मोजणी करण्यापूर्वी 50 चौरस मीटर ( अर्धा गुंठा) जागेतील सोयाबीन पिकाची जागेवरच मजुरांकडून कापणी करुन घेतली. त्यानंतर जिल्हा विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत पिकाचे मोजमाप करण्यात आले.

सद्य:स्थितीत पावसामुळे सोयाबीनच्या दाण्यांमध्ये आर्द्रता असल्यामुळे या पिकाची परत दोन दिवसांनी फेरमोजणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. सर्जापूर ते कुंडखुर्द पांदणरस्त्याची कौर यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पांदणरस्त्याचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. पांदणरस्त्याचे काम कृती आराखड्यामध्ये घेतले असून त्याला मान्यता प्राप्त असल्याची माहिती तहसीलदार लबडे यांनी यावेळी दिली.

अमरावती तालुक्यातील मौजा कामुंजा येथील मनरेगाअंतर्गत सन 2018-19 मध्ये फळबाग लागवड करण्यात आलेल्या इब्राहिम कासिन या शेतकऱ्याच्या शेताची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतकरी कासिन यांच्या शेतामध्ये 2 एकरमध्ये संत्रा पिकाची लागवड करण्यात आली आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात. शिवाय शेतकऱ्यांवर या बाबतीत कसलाही भुर्दंड पडू नये, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच ‘मनरेगा’ अंतर्गत अधिकाधिक विकासकामे राबविण्यात यावी, असेही कौर यावेळी म्हणाल्या. तालुक्यातील पीक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान भरपाई ,संगणकीकृत सातबारा आदींबाबत त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तहसिलदार संतोष काकडे, तालुका अधीक्षक कृषी अधिकारी किशोर हामागडे, मंडळ कृषी अधिकारी निता पवाने आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!