‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी कांद्याचा झालाय वांदा… केवळ 7 दिवसात 1 हजार रुपयांची घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : काही दिवसांपुर्वी 3000-4000 मिळणारा कांद्याचा दर आता 1900 पर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात राहावेत याकरिता सरकारने काही मोठी पावले उचलली आहेत. नाफेडमार्फत खरेदी केलेल्या बंपर साठ्यासह इराण, तूर्की , अफगाणिस्तान या विदेशातून कांदा आयात होत आहे. आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सात दिवसांत 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याला आता 1900 रुपये असा सर्वसाधारण दर मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

अशाप्रकारे कांद्याच्या दरात घसरण

–लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात कांद्याचे सर्वसाधारण दर 2880 रुपये इतके होते.
–मात्र, नाफेडचा बंपर साठा व विदेशी कांदा देशांतर्गत मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने दररोज कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
— आतापर्यंत बाजार भावात टप्प्याटप्याने 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज (बुधवारी) 1900 रुपयांपर्यंत बाजार भाव खाली आला होता.
–बुधवारी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत 459 वाहनातून 6 हजार 870 क्विंटल उन्हाळ कांदयाची आवक झाली होती.
— याला कमाल 2452 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1900 रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे.
–तर 10 वाहनातून 150 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली त्याला कमाल 2551 रुपये, किमान 999 रुपये तर सर्वसाधारण 2201 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला आहे.

कांद्याच्या बाजार भावात अशीच घसरण सुरु राहिल्यास कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली जाणार असल्याचे एका माध्यमाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे आयातीचा निर्णय स्थगित झाला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!