200 क्विंटल कांदा फुकट वाटला ; अन शेतकरी मात्र भरल्या डोळ्याने गर्दीकडे पाहत राहिला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने १०० किलो नाही, ५०० किलो नाही तर २०० क्विंटल (२० हजार किलो) कांदा लोकांना मोफत वाटला आहे.

कांद्याला नाही भाव

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहणारे शेतकरी कैलास पिंपळे यांची साडेतीन एकर शेती आहे. ते 2 एकरात कांद्याची लागवड करतात. कैलास यांच्या म्हणण्यानुसार यावेळी पीकही चांगले आले. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला, पण कांद्याचे भाव अचानक घसरल्याने सर्व आशा मावळल्या. हा कांदा बाजारात चार ते पाच रुपये किलोने विकला जात आहे. अशा परिस्थितीत व्यापारीही आमच्या पिकाला योग्य भाव देत नाहीत. अशी कैफियत कैलास यांनी मांडली. कांद्याचे पीक मोठ्या बाजारात नेण्यासाठीही आपल्याकडे व्यवस्था नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. काहीतरी व्यवस्था केली तरी उपयोग नाही, कारण कांदा विकूनही मोठ्या बाजारात पीक नेण्याचा खर्च वसूल होणार नाही.

२०० क्विंटल कांदा मोफत वाटला

साठवणुकीचे कोणतेच साधन नसल्यामुळे शेगाव शहरातील माळीपुरा येथे राहणारे कैलास पिंपळे यांनी 150 ते 200 क्विंटल कांद्याचे पीक घरासमोर ठेवले होते. उन्हामुळे हा कांदा खराब होऊ लागला होता. शेतकर्‍याने लोकांना फुकटात कांदा घेण्याची विनंती केली. सुरुवातीला लोकांचा विश्वास बसला नाही, मात्र शेतकऱ्याने वारंवार सांगण्याने कांदा नेण्यासाठी लोकांची गर्दी झाली. शेतकरी मात्र लोक कांदे घेऊन जात असताना भरल्या डोळ्यांनी गर्दीकडे पाहत होता. मोठ्या काबाडकष्टाने पिकवलेल्या मालाचे हाती काहीच आले नव्हते. काही दिवसांपूर्वीही, जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपले कांद्याचे पीक शेळ्या-मेंढ्यांना खायला दिले होते. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आंदोलनाचा इशारा

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. केंद्र सरकार आपली शहरी भागातील व्होट बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवायचे असेल, तर केंद्राच्या एमएसपीनुसार पिकांची खरेदी करावी. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर महाराष्ट्रात मोठे आंदोलन संघटनेतर्फे करण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!