शेतकऱ्यांनो सावधान…! ‘या’ साखर कारखान्यात ऊस बिलातून वसूल केले वीजबिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिलातुन वीजबिल वसुली करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र राज्यातल्या एका साखरकारखान्यात ऊसबिलातून वीजबिल वसुली केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे ही वसुली कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे कारखान्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवाहर शेतकरी सहकारी कारखान्यात शेतकऱ्याच्या ऊस बिलातून वीजबिल वसूल केल्याचे समोर आले आहे. अभिजित पाटील या शेतकऱ्याने आपला ऊस कोल्हापूर येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास विक्रीसाठी नेला होता. मात्र शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या ऊसबिलातून वीजबिल कपात केली. त्यामुळे त्यांनी कारखान्यावर रोष व्यक्त केला आहे.

या सर्व प्रकरणावर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांना विचारणा केली असता राज्य शासनाने वीज बिल वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी कथन केले. आवाडे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या परवानगीनेच बिलातून वीजबिल वसूल केले जाईल. मात्र वास्तवात तसे होताना दिसत नाही कारण की अभिजीत पाटील या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलातून वीजबिल वसुलीची कुठलीच पूर्वकल्पना न देता त्यांच्या परवानगीविना वीज बिलाची वसुली केली गेली आहे.

याबाबत स्वभिमानी आक्रमक
दरम्यान , स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसबिलातून वीजबिल वसुलीच्या निर्णयाचा सुरुवातीपासूनच विरोध दर्शवत आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत मत व्यक्त करताना सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कारखान्याला ऊसबिलातून वीजबिल वसूल करण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र कारखान्यांनी ऊसबिलातून वीजबिल वसुली सुरु केली आहे. अशा पद्धतीने विज बिल वसूल केले तर त्यांच्यावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करू असे राजू शेट्टी यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!