सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेना : विखे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांचे वडील विठ्ठलराव घोलप यांचे नुकतेच निधन झाले. विखे पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘‘मी कृषीमंत्री असताना पीकविमा योजना प्रभावीपणे राबविली होती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता. सध्याच्या सरकारने मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. विमा कंपन्यांचाच सर्वाधिक फायदा झाला. त्यामुळे या योजनेचे निकष बदलण्याची मागणी मी सरकारकडे केली आहे.’’

गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोनगाव, सात्रळ व धानोरे (ता. राहुरी) पंचक्रोशीतील लसीकरणातील हलगर्जी कारभाराविषयी नाराजी व्यक्त करून विखे पाटील म्हणाले, ‘‘कोल्हारच्या आरोग्य केंद्राने गाव तेथे लसीकरणाची मोहिम नियोजनबद्ध राबविली. त्यामुळे लाभार्थींची लसीकरणाबाबत तक्रार नाही. पंचक्रोशीतील वरील गावांमध्ये लसीकरणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याशी बोलू व आरोग्य केंद्राशी संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देऊ.’’

 

Leave a Comment

error: Content is protected !!