शेतकऱ्यांनो तुमच्या जमिनीचा पोत सुधारा..! जाणून घ्या, गांडूळखताचे फायदे आणि तयार करण्याच्या पद्धती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या शेतात रासायनिक खते वापरण्याऐवजी जैविक खतांचा वापर करणे केव्हाही फायद्याचे ठरते. रासायनिक खतांचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. अधिकाधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा उपजाऊपणा देखील कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.सदरील माहिती दैनिक ‘जागरण’ च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

मातीसाठी उपयुक्त आहे गांडूळखत

मातीच्या दृष्टिने गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते. गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. जमिनीचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.

शेतक-यांच्या दृष्टीने गांडूळखताचे फायदे

इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत. मजूर वर्गावर होणारा खर्च कमी. गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.

पर्यावरणाच्या दृष्टीने गांडूळखताचे फायदे

माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते. जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते. रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते. कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.

गांडूळखताचे उपयोग

–गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस्‌ आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
–पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
–आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
–पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो.

गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती: गांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.

गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ:

पिकांचे अवशेष: धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत इ.
जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते: शेण, मूत्र, शेळ्या लीद, कोंबड्यांची विष्ठा, इ.
फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा
हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ.
घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इ.

गांडूळखत करण्याच्या पद्धती:

गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.

ढीग पद्धत:

ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.

साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

खड्डा पद्धत:

या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.

खत तयार होण्यास लागणारा कालावधी: गांडुळाचा वापर करून खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळखत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी:

गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.
खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याअगोदर 1 दिवस पाणी मारावे.
गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे

गांडूळ खत काढण्याची पद्धत:

खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!