शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पेरणीबाबत हवामान विभागाने दिला महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे. मात्र आता पाऊस आणखी काही दिवस दडी मारणार असल्यामुळे हवामान विभागाने पेरणीसाठी घाई न करता कृषी विभागाचा सल्ला जरूर घ्यावा असे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांच्या पेरण्यांबाबत हवामान तज्ज्ञ के एस . होसाळीकर यांनी म्हंटले आहे की, “राज्यातील तापमानामध्ये परत एकदा वाढ होताना दिसत असून IMD ने पूर्वानुमान दिल्या प्रमाणे राज्यात येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणीची कृपया घाई करू नये व IMD व कृषी विभाग कडून मिळणारे सल्ले उपयोगात आणावे”. असा सल्ला होसाळीकर यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी पडण्या पलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिण भागातील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने जाहीर केला आहे.

याच काळात उत्तर पूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्‍चिम भागातील वाऱ्यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत मध्यभारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!