रबी (उन्हाळी) कांदा पिकामध्ये खत आणि तण व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रबी (उन्हाळी) असे महत्वाचे प्रकार आहेत. रबी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये केली जाते. साधारणतः ८-१० किलो बियाणांपासून रोपवाटिका (नर्सरी) तयार केल्यास एक हेक्टर क्षेत्र लागवड करण्यासाठी रोपांची संख्या पुरेशी असते. साधारणतः ८-९ आठवड्याच्या रोपांपासून १५ x १० सेमी अंतरावर पुनर्लागवड करतात.

खत व्यवस्थापन

कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारनाणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी च्या शिफारशीनुसार पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. नत्र विभागून दोन ते तीन हफ्त्यात दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पूर्ण पोसल्यानंतर मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिले तर डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात. तेव्हा शिफारस केलेले नत्र लागवडीनंतर रब्बी-उन्हाळी हंगामात 45-60 दिवसांत दोन हफ्त्यात विभागून देणे फायदेशीर ठरते. पिकांच्या मूळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. स्फुरदाची मात्रा एकाच वेळी आणि ती पिकांच्या लागवडी वेळी द्यावी. जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर आहे, मात्र पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी असल्यामुळे कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, तसेच कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी, पालाशची आवश्यकता असते. पिकाच्या लागवडी वेळी स्फुरदाबरोबर पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. या व्यतिरिक्त रब्बी हंगाम कांदा पुनर्रलागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर गंधक हेक्टरी 45 किलो या प्रमाणात द्यावे.

माती परिक्षणानुसार खत मात्रा द्यावी. कांदा पिकास नत्र शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसानंतर दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते मान जाड होतात. कंद आकाराने लहान राहतो. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवणक्षमता कमी होते.

तण व्यवस्थापन

कांदा पिकाची घनता तीव्र असते तसेच पिकाचे मूळ उथळ असल्यामुळे पीक-तण स्पर्धा कालावधी लागवडीपासून ते ४५ दिवसापर्यंत खूप असते. जर या पीक-तण स्पर्धा कालावधी मध्ये खुरपणी करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्यास कांद्यामध्ये ४५-६० % उत्पादन घटण्याची शक्यता असते. म्हणून या काळामध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.५ % ई. सी. १-१.२५ मिली/ लिटर पाणी या प्रमाणात (लागवडीच्या २ दिवस अगोदर किंवा लागवडी पासून एक आठवडयाच्या आत) फवारणी करावी तसेच लागवडी पासून ३० दिवसांनी एक खुरपणी करावी. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे असते. ऑक्झीफ्लोरफेन हे ताण नाशक कांद्यामध्ये प्रीएमेर्जेंट तसेच पोस्टएमेर्जेंट म्हणून देखील फवारू शकतो.

संदर्भ : बळीराजा मासिक

Leave a Comment

error: Content is protected !!