Banana : श्रावणाच्या प्रारंभीच केळी उत्पादकांना सोन्याचे दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केळी हे सर्वसामान्य माणसांचे फळ मात्र मागच्या तीन वर्षात मिळाला नाही इतका चांगला दर सध्या केळीला मिळतो आहे. किरकोळ खरेदीत केळीला प्रति डझन ७० रुपये भाव मिळतो. तर प्रति टन २२००० भाव मिळतो आहे.

केळीच्या दरात सात महिन्यांत तब्बल सात पट वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये असणारा ३००० रुपये प्रति टनाचा भाव आता जुलै मध्ये २२००० पर्यंत गेला आहे. यंदा लागवडी कमी असल्याने श्रावण मासाबरोबरच पूर्ण वर्षभर केळीची चणचण जाणवेल, असा अंदाज आहे. जळगाव बरोबरच अन्य भागातील केळींना उत्तर भारतातून व स्थानिक ठिकाणाहून ही मागणी वाढली आहे. येणाऱ्या महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रम असल्याने मागणीत वाढच होणार आहे. नेमकी याच वेळी केळी नसल्याने दरही मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे.

केळीसाठी व्यापारांचा 50 ते 100 किलोमीटरचा प्रवास

एक दोन एकर केळीसाठीही केळी व्यापारी ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे दुर्मीळ चित्र यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. केळी कमी प्रमाणात असल्याने जिथे केळी आहे तिथे जाऊन डायरेक्ट पैसे देऊन तिथूनच केळी व्यापारी उचलत आहेत. राज्यभरातच केळी नसल्याने यंदा पुढील वर्षभर केळीला सातत्याने मागणी राहील. असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर केळी उत्पादकांनी संभाव्य नुकसान पाहता केळीच्या बागा काढून टाकल्या. तिथूनच दर वाढण्यास सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याला टनास दोन ते तीन हजार रुपयांची वाढ झाली. केळी लागवड नसल्याने दराचा वाढणारा वारू हा चौफेर उधळतच राहिला. श्रावणाच्या पार्श्‍वभूमीवर दर वाढतील, अशी शक्यता होती आणि आता ती खरी ठरली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!