GOOD NEWS ! राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात असमान पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नजरा ह्या राज्य सरकारकडे होत्या. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती. मात्र आता अखेर राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य राज्यसरकारने अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणात पुरामुळे ५५ लाख हेक्‍टर हून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता दहा हजार कोटींचे अर्थसहाय्य म्हणजेच पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भातली घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भसहित , कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागातही पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

असे असेल राज्य सरकारच्या मदतीचे स्वरुप

–जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
–बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
–बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
–ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांचा दबाव

अतिवृष्टीमुळे सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यात विदर्भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होतं. तसेच पुरामुळे मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती. त्याचबरोबर राज्यातील विरोधी पक्ष तसेच काही शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वारंवार राज्य सरकारवर टीका करताना दिसून येत होत्या. शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही तसेच ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा काही शेतकरी संघटनांनी दिला होता. एवढंच नव्हे तर राज्यातील प्रमुख मंत्री हे अतिवृष्टी झालेल्या भागात दौरा करत नाहीत तेथील परिस्थिती पाहत नाहीत , शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेत नाहीत अशाही टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत होत्या. मात्र याला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले होते की आम्ही सर्व यंत्रणा मंत्रालयातून कार्यरत करत होतो. अतिवृष्टी भागात हेलीकॉप्टर , एनडीआरएफ च्या टीम आणि मदत पाठवत होतो. तसेच पिकांचे पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा येताच पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता अखेर पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!