यंदा कसा असेल पाऊस ? स्कायमेटने वर्तवला अंदाज ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतो आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अशात शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. खासगी आणि सरकारी हवामान संस्थांकडून किती आणि कसा पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला जातो. खासगी हवामान संस्था स्कायमेटने देखील २०२२ मध्ये पडणाऱ्या पावसाबद्दल अंदाज व्यक्त केला आहे.

सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता
स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर देशात मान्सून सर्वसाधारण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे . तर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.


२०२२ च्या मॉन्सूनचा पहिला तपशीलवार अधिकृत अंदाज स्कायमेटने जाहीर केला आहे. त्यानुसार राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना संपूर्ण हंगामात पावसाची कमतरता जाणवेल. तसेच, केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कमी पाऊस पडेल. परंतु धान्याचे कोठार असलेल्या पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेश येथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कोरडवाहू भागांतही यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. यात ५ टक्के कमी किंवा अधिक तफावत गृहित धरली आहे. मॉन्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा असतो. त्यासाठीची दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) सुमारे ८८१ मिलीमीटर आहे. त्याच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस झाला तर तो ‘सर्वसाधारण’ मानला जातो. “मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्तरार्धाच्या तुलनेत चांगले पाऊसमान राहील. जूनमध्ये मॉन्सूनची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे,” असे स्कायमेटने म्हटले आहे.

मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या एल-निनो या घटकाचा सामना यंदा करावा लागणार नाही; परंतु पावसात मोठे खंड, अचानक आणि तीव्र पाऊस अशा गोष्टी घडतील, असे स्कायमेटच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. मॉन्सूनचा एकूण चार महिन्यांच्या कालावधीचा विचार करता पाऊसमान सर्वसाधारण राहील; परंतु महिनावार होणाऱ्या पावसात चढ-उतार दिसून येईल, पावसाच्या मासिक वितरणात बदल होतील असे या अंदाजावरून स्पष्ट होते.

स्कायमेट ही हवामानविषयक अंदाज व्यक्त करणारी खासगी संस्था आहे. यापूर्वी या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजावरून बऱ्याच उलट-सुलट चर्चा झालेल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) या सरकारी संस्थेने अद्याप यंदाच्या मॉन्सूनचा दीर्घकालिन अंदाज जाहीर केलेला नाही. आयएमडीचा अंदाज आल्यानंतर यंदाच्या हंगामात ढोबळ पाऊसमान कसे राहील, याचे चित्र आणखी स्पष्ट होईल.

संदर्भ : ऍग्रो वन

Leave a Comment

error: Content is protected !!