अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; झळ मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना, केळीच्या दरावरही होणार परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता चाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटक केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर याचा परिणाम केळीच्या सामान्य व्यापारावर देखील पडू शकतो. त्यामुळे केळीचे भाव गडगडू शकतात.

केळीच्या निर्यातीवर ‘स्टे’

अफगाणिस्तान हा इराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन केलंय. मात्र सध्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याबाबत ‘हॅलो कृषी’ने लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे गजेंद्र पोळ यांच्याशी चर्चा केली. केळीच्या निर्यातीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ” सोलापूरहून केळी इराण, इराक, अफगाणिस्तान या देशात निर्यात केली जातात. यापैकी १० टक्के केळी ही अफगाणिस्तानात निर्यात केली जातात. यापूर्वी १७ तारखेला शेवटचा कंटेनर अफगाणिस्तानात निर्यात झाला आहे. त्यानंतर मात्र अफगाणच्या कंपनीकडून केळीच्या निर्यातीवर ‘स्टे’ आणण्यात आला आहे. म्हणजेच अफगाणिस्तानात होणारी केळीची निर्यात स्थगित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर टांगती तलवार

ते पुढे म्हणाले, “सोलापुरातून अफगाणमध्ये केळी आयात करणाऱ्या कंपनीने आयात पूर्णपणे बंद करीत असल्याचे सांगितले नाही मात्र त्यावर स्टे आणल्यामुळे नक्की काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मात्र अडकून राहण्याची शक्यता आहे. तसेच अफगाणमध्ये यापूर्वी देखील तालिबानी सक्रिय असताना केळीची निर्यात होत होती. मात्र सध्याची तेथील परिस्थितीत स्थिरता नसल्यामुळे सर्वकाही अनिश्चित आहे. त्यामुळे निर्यातीसाठी केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यावर मात्र टांगती तलवार आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून घेतलेला माल या ना त्या कारणाने दुसऱ्या बाजारपेठेकडे वळवू शकतात. मात्र सामान्य शेतकरी या ठिकाणी अडचणीत येण्याची शक्यता आहे अशी भीती पोळ यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल घेतला जाऊ शकतो. म्हणजेच समजा आता शेतकऱ्याला किलोमागे १४ रुपये इतका दर मिळत असेल तर तो केवळ २ ते ३ रुपये इतक्या कमी प्रमाणात मिळू शकतो अशी भीती पोळ यांनी व्यक्त केली आहे.

सामान्य बाजारातही केळीचे भाव गडगडण्याची शक्यता

दरम्यान, निर्यात बंद असल्याचा परिणाम सामान्य बाजारपेठेवर देखील होऊ शकतो असे पोळ यांनी म्हंटले आहे. निर्यात स्थगित असल्यामुळे बाजरात केळ्यांची आवक वाढेल. त्यामुळे साहजिकच त्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी निर्यात करणारा शेतकरी वर्ग सोडून जो सामान्य बाजारात केळीचा व्यापार करणारा शेतकरी आहे त्याच्यवरही परिणाम होऊन केळीला कमी दर मिळण्याची शक्यता असल्याचे पोळ यांनी म्हंटले आहे.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!