रब्बी ज्वारीवर चिकटा, खोड कीड , लष्करी आळीचा प्रादुर्भाव ; वाचा काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाड्यात दिनांक 27 फेब्रूवारी ते 05 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग : वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

करडई : करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

आंबा : आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

Leave a Comment

error: Content is protected !!