हरभऱ्यात घाटे अळी तर उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल व्यवस्थापन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

१) हरभरा : हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

२) करडई : मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे.

३)हळद : हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

४)ऊस : मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

error: Content is protected !!