जायकवाडीचे अठरा दरवाजे पुन्हा उघडले; गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | स्थानिक क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आले. वरील पाण्याची आवक लक्षात घेता, गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल, अशी माहिती जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारी आवक जवळपास बंद झाली व स्थानिक पाऊस मंदावल्याने ६ ऑक्टोबर रोजी धरणाचे सुरू असलेले दोन दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात ९,४३२ क्युसेक विसर्गाला प्रारंभ करण्यात आला आहे.

यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचे दरवाजा क्रमांक १० ते २७ दीड फुटाने वर उचलून विसर्ग २८,२९६ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. या विसर्गामुळे गोदावरी पात्र दुथडी भरून वाहते झाले असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदा दि १८ सप्टेंबर रोजी धरणाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले होते, यानंतर दि २६ सप्टेंबला पुन्हा आपत्कालीन दरवाजे उघडावे लागले होते. एकाच सत्रात धरणाचे आपत्कालीन दरवाजे दुसऱ्यांदा उघडून विसर्ग करण्याच जायकवाडीच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता.

Leave a Comment

error: Content is protected !!