हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याला एखादी जमीन खरेदी करायची असेल किंवा मग जमिनीचे व्यवहार करताना ‘खरेदी खत’ (Kharedi Khat) हा शब्द आपल्या नेहमीच कानी पडतो. मात्र, खरेदी खत म्हणजे नेमके काय? याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का? खरेदी खत करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अनेकांना यासाठीच्या कायदेशीर गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे अचानक तुम्ही एखादी जमीन खरेदी करायचे ठरवले तर तुम्हांला अनेक अडचणी येऊन, तुमची तारांबळ उडू शकते. किंवा मग अशा व्यवहारात तुमची फसवणूक देखील होऊ शकते. यामुळेच आज आपण खरेदी खताबाबतची (Kharedi Khat) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
खरेदी खत म्हणजे काय? (Kharedi Khat Required Documents)
एखादी जमीन खरेदी करताना किंवा त्या जमिनीचा व्यवहार करताना संबंधित जमिनीची रक्कम ही जमीन घेणारा आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली असते. जमीन घेणाऱ्याने ही रक्कम दिल्यानंतर खरेदी व्यवहार पूर्ण होतो. त्यानंतर संबंधित जमिनीचे खरेदी खत केले जाऊ शकते. खरेदी खत झाल्यानंतर जमिनीचा मालकी हक्क हा जमीन विकत घेणाऱ्याकडे जातो. अर्थात एखादी जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणजे ‘खरेदीखत’ होय.
अशीच शेती संदर्भातील नवनवीन कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती, दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहू शकता.
काय आहे खरेदी खताची प्रक्रिया?
- खरेदी खत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला संबंधित जमिनीचे मुद्रांक शुल्क काढावे लागते.
- हे मुद्रांक शुल्क तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन काढू शकतात.
- त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी खत करण्यासाठी लागणारे नोंदणी शुल्क, कागदपत्रे, खरेदी खतासाठीचा कार्यालयीन खर्च याबाबत माहिती दिली जाते.
- त्यानंतर सर्व्हे नंबर, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्र, जमीन खरेदी करण्याचे आणि विकणाऱ्याचे प्रयोजन, या सर्व बाबी दुय्यम निबंधकांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद कराव्या लागतात.
कोणती कागदपत्रे लागतात?
- संबंधित जमिनीचा सातबारा
- मुद्रांकशुल्क
- संबंधित जमिनीचा आठ-अ उतारा
- मुद्रांक शुल्काची पावती
- प्रतिज्ञापत्र
- फेरफार
- दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो
- एनए ऑर्डर ची प्रत
- ही सर्व कागदपत्रे खरेदी खत करण्यासाठी जोडून, डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जमा करावी लागतात.
जमीन घेणाऱ्याने काय काळजी घ्यावी?
- जमीन खरेदी करताय? मग… या गोष्टींची काळजी घ्याच, नाहीतर होईल मनःस्ताप!
(https://hellokrushi.com/land-purchase-care-of-these-things/)
जमीन विकणाऱ्याने काय काळजी घ्यावी?
खरेदी खत करण्यापूर्वी जमिनी विक्री करणाऱ्याने जमीन खरेदीदाराकडून ठरलेली सर्व रक्कम घ्यावी. जर जमीन खरेदी करणारा सर्व रक्कम देत नसेल तर खरेदी खत करू नये. एकदा केलेला खरेदी खत हा सहजासहजी रद्द होत नाही. कारण खरेदी खतामुळे जमीन खरेदी करणाऱ्याला सर्व मालकी हक्क प्राप्त होत असतो. खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे जमीन खरेदी करताना सर्व प्रक्रिया आणि आर्थिक रक्कम हस्तांतरित झाल्यानंतरच खरेदी खत करावा.
(टीप – जमीन खरेदी-विक्रीबाबतच्या नियमावलीत बदल होत असतात. हे बदल जिल्ह्याधिकारी स्थानिक पातळीवर करू शकतात. त्यामुळे संपूर्ण कायदेशीर माहिती घेऊनच जमीन व्यवहार करावा.)