Kharif 2022 : मका पेरणीसाठी ‘ही’ आहे योग्य वेळ ; जाणून घ्या मका लागवडीसंबंधी महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिमरबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो. आजच्या लेखात आपण मका लागवडीविषयी काही महत्वाची माहिती घेणार आहोत. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.

हवामान

मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से तापमान चांगले असते ; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्‍याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा.

मका लागवडीसाठी जमीन

मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू ८.५ पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी.

मका लागवडीसाठी वाण

अ) संकरित वाण : डेक्कन-१o३, १o५, गंगा-११, त्रिशुलता, जे.के. २४९२, प्रो-३१0,३११,३१२, बायो-९६८१, सिडटेक-२३२४, के.एच.९४५१, बायो-९६३७, एच.क्यू.पी.एम-५, सरताज, राजर्षी, एच.क्यू.पी.एम-७

ब) संमिश्र वाण : आफ्रिकन टॉल, मांजरी, किरण, पंचगंगा, करवीर

बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया

एक हेक्‍टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

पेरणीची योग्य वेळ

पेरणी २८ मे ते २० जून दरम्यान करावी. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. मध्य विदर्भ विभागात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात करावी. खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही.

लागवड पद्धत

उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. सरी – वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी.

पेरणीनंतर घ्यावयाची काळजी

अ) पक्षी राखण – खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण पाच ते सहा दिवसांत होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशा वेळी देखील पीक राखण आवश्‍यक असते.
ब) विरळणी – मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी – मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्‍याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!