शेतकरी मित्रानो ! जाणून घ्या, खरिपातील ज्वारी लागवडीचे तंत्रज्ञान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. राज्यात खरीप हंगामात बहुतांशी कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन अशा पिकांची लागवड केली जाते. ज्वारी हे जगातील चार अन्नधान्याच्या पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारी हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अन्नधान्याचे प्रमुख पीक मानले जाते. तसेच जनावरांच्या चार्‍यातील महत्त्वाचा अन्नघटक म्हणून यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पूर्व खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पीक सर्वसाधारणपणे घेण्यात येते. ज्वारीचे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. ज्वारीची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्राची माहिती ‘बळीराजा’ मासिकाच्या माध्यमातून येथे दिली आहे.

कशी असावी जमीन

पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत हे पीक उत्तम येते. यासाठी मध्यम ते भारी जमिन निवडावी. ज्वारीचे पीक हे 5.5 ते 8.4 (पीएच) असलेल्या जमिनीत घेता येते. जमिनीची पूर्वमशागत चांगल्या प्रकारे केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते व तणांचासुद्धा प्रार्दुभाव कमी होतो. ज्वारी पिकाकरिता दरवर्षी नांगर टकरण्याची आवश्यकता नाही, तरीपण 2-3 वर्षांनी एकदा जमीन नांगरावी. उन्हाळ्यात वखराच्या 3 ते 4 खोलपाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी. शेतातील काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या पाळीपूर्वी 10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

कधी केली जाते पेरणी

खरीप ज्वारीची पेरणी नियमित पावसाळा सुरू झाल्यावर जूनच्या 3र्‍या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होऊन झाडांची संख्या कमी होते, त्यामुळे उत्पादनात घट होते, म्हणून पेरणी वेळेवर करावी.

लागवड

खरीप ज्वारीसाठी हेक्टरी झाडांची योग्य ती संख्या मिळण्यासाठी दोन ओळींमध्ये 45 सें. मी. अंतर ठेवून हेक्टरी 7.5 ते 10 किलोप्रमाणित बियाणे वापरावे. पेरणी शक्यतो दोनचाड्यांच्या तिफणीने 3 ते 4 सें.मी. खोलीवर करावी. बी जास्तखोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून पेरणीसोबत खते देणे सोईचे होईल. पेरणीपासून 12 ते 15 दिवसांनी विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडांतील अंतर 10 ते 12 सें.मी इतके ठेवावे. अशाप्रकारे खरीप ज्वारीची पेरणी करावी.

रासायनिक खते

— खरीप ज्वारी रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते.
–त्यामुळे 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
–यापैकी 40 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी सोबतच द्यावे व उरलेल्या 40 किलो नत्राची मात्रा ज्वारीच्या पिकाला 25 ते 30 दिवसांनी द्यावी.
–वरील खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करावी. जमिनीत उपलब्ध पालाशचे प्रमाण जास्त असेल तर पालाशची मात्रा देणे टाळावे.

आंतर मशागत

–खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीस आंतरमशागतीचे फार महत्त्व आहे.
–ज्वारीचे पीक हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे पीक असल्यामुळे जमिनीत जास्तीतजास्त ओलावा टिकवून ठेवणे अधिक उत्पादनाच्यादृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
–ज्वारीचे पीक 40 दिवसांचे होईपर्यंतच 3 ते 4 वेळा डवर्‍याच्या पाळ्या द्याव्यात.
–तणांचा जास्तप्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा निंदणी करावी.
–त्यामुळे शेतात सर्‍यापाडून पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन

खरीप ज्वारी हे कोरडवाहू पीक असल्यामुळे ओलिताची गरज भासत नाही. परंतु पाऊस न पडल्याने पिकाला ताण पडल्यास पिकाची वाढ खुंटू नये म्हणून पाणी देण्याची सोय असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे.

संकरित व सुधारित वाण

खरीप लागवडी करिता शिफारस केलेले संकरित व सुधारित वाण तक्त्यात दिलेले आहे.
खरीप लागवडी करिता शिफारस केलेले संकरित व सुधारितवाण

अ.क्र. वाणाचे नाव परिपक्वतेस लागणारा कालावधी (दिवस) हेक्टरी उत्पादन (क्विंटल)
धान्य कडबा
1 लवकर येणारेसंकरितवाण 100-105 48-50 85-90
2 सी.एस.एच.-17* 100-105 42-45 95-100
3 सी.एस.एच.-14* 100-105 42-50 95-100
ब) मध्यम कालावधीचे संकरित वाण
1 सी.एस.एच.-9 110-115 48-50 100-105
2 एस.पी.एच.-388 100-115 48-50 102-125
3 सी.एस.एच.-16* 110-115 45-50 105-110
4 सी.एस.एच.-25* 110-115 45-50 110-115
5 एस.पी.एच-840* 110-115 48-50 105-110
6 एस.पी.एच.-1635 110-115 48-50 120-125
क)
सुधारित/शुद्धवाण
1 एस.पी.व्ही.-669 115-110 38-40 120-125
2 सी.एस.व्ही.-15 115-110 36-37 125-130
3 पी.व्ही.के.-400 115-110 35-36 120-125
4 सी.एस.व्ही.-23 115-110 25-30 150-155

*या वाणांचा खोडवा घेता येतो.

कापणी व मळणी

ज्वारी पक्व होताच व दाणे टणक झाल्याबरोबर ज्वारीची कापणी करावी व कणसे खुडून खळ्यावर आणावीत. मळणी यंत्राचा वापर करून शक्य तितक्या लवकर मळणी आटोपावी. मळणी झाल्यावर ज्वारीस एक-दोन उन्हे द्यावीत. म्हणजे माल गोडाऊनमध्ये साठवताना किडींचा उपद्रव होणार नाही. कापणीच्यावेळी दाण्यामध्ये पाण्याचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपर्यंत खाली आणणे आवश्यक आहे. कापणीस उशीर झाल्यास शेतात दाणे झडण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे पक्ष्यांपासूनही पिकाचे नुकसान होते. त्यामुळे वेळेवर कापणी व मळणी करणे हेसुद्धा उत्पादन वाढीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे.

धान्य साठवणुकीत घ्यावयाची काळजी : शेतकरी बंधूंनो, पिकाची उत्पादकता वाढविणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे उत्पादन केलेले धान्य सुरक्षित साठवणे होय, त्यासाठी धान्य साठवणुकीतील महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे-

अ) स्वच्छता : धान्याच्या साठवणुकीत स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. मळणी केल्यानंतर धान्य उन्हात वाळवून साफ करणे. धान्य उन्हात वाळविल्याने टणक होते व त्याची गुणवत्ता टिकून राहते व कीड लागण्याची संभावना किंवा शक्यता कमी असते.

ब) ओलावा : धान्य सुरक्षित राहण्यासाठी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 त 12 टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे धान्यात किडींची वाढ होत नाही.

क) धान्याची चाळणी करणे : ही पद्धत साधी-सोपी आणि परिणामकारक आहे. धान्यामध्ये असणार्‍या किडी चाळणीच्या माध्यमातून वेगळ्या होतात. वेगळ्या झालेल्या किडी ताबडतोब नष्ट कराव्यात.

ड) रासायनिक उपाय : धान्याला कीड लागू नये म्हणून काही कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये मॅलॅथिऑन (50% प्रमाण) 0.50% किंवा डेल्टामेथ्रिन (2.5% पाण्यात मिसळणारी पावडर) 0.10% प्रमाणे धान्य साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, साठवणुकीची जागा, रिकामी कणगी तसेच वाहतुकीची साधने फवारणी करून निर्जुंतुक करावी. उघड्या धान्यावर मात्र फवारणी करू नये. तसेच धुरीजन्य औषधांचा वापरसुद्धा किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो. त्याकरिता अ‍ॅल्युमिनियम फॉस्फईडच्या 2-3 गोळ्या प्रति टन धान्य साठवण्यासाठी वापराव्या.

धान्याची मळणी करण्यापासून ते साठवुणकीपर्यंत जर वरील उपायांचा अवलंब केला तर शेतकरी बांधवांच्या घरी, गोदामात तसेच ग्राहकांच्या घरी धान्य कीडमुक्त राहू शकते किंवा कमीतकमी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होईलच तसेच धान्याची नासाडी टाळता येऊ शकेल.

Leave a Comment

error: Content is protected !!